सचिन पिळगावकर यांचा ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट मराठी चित्रपटांपैकी एक एव्हरग्रीन चित्रपट महून आजही लोकप्रिय आहे. २००४ साली आलेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. चित्रपटाची कथा, गाणी तसेच कलाकारांच्या भूमिका अशा सर्वच बाबतीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. अशातच आता दोन दशकानंतर या चित्रपटाचा सीक्वेल (पुढचा भाग) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २० वर्षानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘नवरा माझा नवसाचा २’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा झाली होती. यामुळे चाहते चांगलेच खूश होते.
काल या चित्रपटातील अशोक सराफ यांचा पहिला लूक समोर आला आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची लालू कंडक्टरची भूमिका फार पसंतीस उतरली होती. ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. पण ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटात लालू कंडक्टर दिसणार नसून ते टीसी झाले आहेत. लूकबरोबरच चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारीखेची घोषणा करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. अशातच आता या चित्रपटाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.
दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांनी नुकतंच त्यांच्या सोशल मीडियाद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याद्वारे त्यांनी हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याबद्दल सांगितले आहे. पण या खास व्हिडीओद्वारे ‘नवरा माझा नवसाचा २’ मध्ये एसटीच्या प्रवासाऐवजी रेल्वेचा प्रवास अनुभवता येणार आहे. या व्हिडीओमध्ये सुप्रिया व सचिन पिळगांवकर यांच्यासह अशोक सराफ ट्रेनच्या दरवाज्यातून यावेळचा प्रवास कोकण रेल्वेचा असल्याचे सांगतात. त्यानंतर यात स्वप्निल जोशी व हेमल इंगळेदेखील येतात.
चित्रपटाचा हा नवीन व्हिडीओ प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला असून अनेकजण या नवीन भागाची आतूरतेने वाट पाहत आहेत. अशोक सराफ, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अली असगर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार आदी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. तसेच याबरोबरच प्रेक्षकांसाठी काही नवीन ट्विस्ट असणार आहेत? त्यामुळे या चित्रपटासाठी प्रेक्षक खुपच उत्सुक आहेत.