संपूर्ण महाराष्ट्रात रविवारची दुपार वादळी ठरली, कारण राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. अजित पवार यांनी आपल्या आमदारांसह बंडखोरी करत विद्यमान सरकारला पाठिंबा दिला व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ही बातमी जेव्हा वाऱ्यासारखी पसरली, तेव्हा यावर अनेकांकडून मीम्स व प्रतिक्रियांचा पाऊस पडला. ह्यात आपले मराठी इंडस्ट्रीतील सेलेब्रिटीसही मागे राहिले नसून, अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आपले मत व्यक्त केले.(Sachin Goswami on Politics)
त्यामध्ये एक नाव सर्वात आधी घेतले जाते, ते नाव म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी. सचिन गोस्वामी हे हास्यजत्रेच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवत असले, तरी विविध मुद्द्यांवर आपलं म्हणणं ते नेहमीच मांडत असतात. सचिन गोस्वामी सोशल मीडियावर सक्रिय असून विशेषतः ते फेसबुकवर विविध घडामोडींवर आपली प्रतिक्रिया ते देत असतात. आता नुकतीच सचिन गोस्वामी यांनी राज्याच्या राजकारणावर एक पोस्ट केली. ज्यात ते म्हणतात, “महाराष्ट्रात सर्व पक्षीय राजवट.. भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपातील काँग्रेसी नेते एकत्र येऊन महाराष्ट्र घडवणार… (मतदारांची ऐशी तैशी.. नैतिकतेच्या आईचा घो….)”
या आधीही सचिन गोस्वामी यांनी विविध घडामोडींवर आपली प्रतिक्रया दिली. त्याचबरोबर ते चाहत्यांच्या प्रतिक्रियांनाही प्रतिसाद देत असतात. सचिन गोस्वामी यांच्या प्रोडक्शन हाऊसअंतर्गत ‘तुजं माजं सपान’ ही मालिका सध्या सुरु असून लवकरच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(Sachin Goswami on Politics)