लोकप्रिय सिनेमॅटोग्राफर केके सेंथिल कुमार यांची पत्नी, योग प्रशिक्षक रुही उर्फ रुहिनाझ यांचे गुरुवारी निधन झाले. सिकंदराबादच्या KIMS हॉस्पिटलमध्ये रुही यांचा मृत्यू झाला. आरोग्याबाबत असलेल्या अनेक समस्यांमुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं. एका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, आयुष्याच्या शेवटच्या दिवसात उपचारादरम्यान अनेक अवयव निकामी झाल्याने रुही यांचा मृत्यू झाला, असल्याचं समोर आलं. (Cinematographer Senthil Wife Death)
सिनेमॅटोग्राफर केके सेंथिल कुमारच्या टीमनेही याबाबतचे अपडेट शेअर केले आहेत. ज्यामध्ये लिहिले आहे की, “सिनेमॅटोग्राफर सेंथिलची पत्नी रुही गरू यांचे (गुरुवारी) दुपारी २ वाजता निधन झाले. (शुक्रवारी) सकाळी ९ वाजता महाप्रस्थानम, ज्युबली हिल्स येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.” या जोडप्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ‘बाहुबली’ सेटवरील रुही व सेंथिलबरोबर प्रभास व अनुष्का शेट्टीचे जुने फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
योग प्रशिक्षक रुही यांनी अनुष्का, प्रभास व इलियाना डिक्रूझ यांसारख्या अनेक सेलिब्रिटींना योगाचे प्रशिक्षण दिले होते. त्या भरत ठाकूरच्या हैदराबाद विभागातील योग वर्गाच्या प्रमुख होत्या. जून २००९मध्ये लग्नानंतर सेंथिल व रुही यांना मुलगा झाला. रुही यांची काळजी घेण्यासाठी सेंथिलने सिनेसृष्टीतुन व त्याच्या इतर कामांमधून ब्रेक घेतला होता. रुही व सेंथिल दोघांनी प्रेमात पडल्यानंतर लग्न केले. लग्नानंतर रुही हैदराबादला राहायला गेली आणि तिथे तिने स्वतःचा व्यवसाय सुरु केला.
सेंथिल त्याच्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी प्रसिद्ध चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांच्या टीमचा भाग आहे. या जोडीने अनेक प्रोजेक्टवर एकत्र काम केले आहे. त्याच्या सहकार्याचे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. राजामौलींच्या कामाच्या भव्यतेचे कौतुक करणाऱ्यांकडून सेंथिलचे सिनेमॅटोग्राफीसाठी नेहमीच कौतुक झाले आहे. त्याने ‘RRR’, ‘मगधीरा’, ‘अरुंधती’, ‘यमडोंगा’, ‘छत्रपती’, ‘ईगा’,’साई’ असे यशस्वी चित्रपट केले. याशिवाय ‘बाहुबली: द बिगिनिंग’ व ‘बाहुबली: द कन्क्लूजन’मध्येही त्यांनी एकत्र काम केले.