बॉलिवूडच्या दिग्गज विनोदी कलाकारांपैकी एक नाव म्हणजे जॉनी लीव्हर. १९८०च्या दशकात या अभिनेत्याने ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश केला आणि आजही तो आपल्या कलेने प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसत आहे. ‘बाजीगर’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘दुल्हे राजा’, ‘बादशाह’, ‘आमदानी अठानी खर्चा रुपैया’, ‘खट्टा मीठा’, ‘गोलमाल’, ‘दे दना दान’ यासह काही मोठ्या बॉलिवूड चित्रपटांमधून जॉनीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. जॉनीची ही सिनेसृष्टीतील कारकीर्द यशस्वी असली तरी इथवरचा त्याचा हा प्रवास काही सोप्पा नव्हता. त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या वाईट काळाबद्दल खुलासा केला आहे. (Johnny Lever On Sucide Phase)
यूट्यूबर रणवीर अल्लाबदियासह ‘टीआरएस’ शोमध्ये झालेल्या संभाषणात जॉनी लीव्हरने त्याच्या आयुष्याबद्दल बरंच भाष्य केलेलं पाहायला मिळालं. याआधी या विनोदी कलाकाराने त्याच्या आयुष्याबद्दल क्वचितच भाष्य केलं आहे. जॉनीने खुलासा करत त्याचे बालपण व त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळाबाबत भाष्य केलं. काही रुपये कमावल्यावरचं जेवण मिळू शकत होतं, असंही त्याने या मुलाखतीदरम्यान सांगितलं.
जॉनी म्हणाला, “लहानपणी अनेक कठीण प्रसंग आले. माझ्या लहानपणी मला माझ्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. मी काम केले तर घरी जेवण शिजायचे. माझ्या वडिलांना ते काय करत आहेत हे कळत नव्हतं. ते बराच वेळ मित्रांबरोबर बाहेर असायचे व कामावरही जात नसत. त्यानंतर ते गुंडगिरी करु लागले. वडील बाहेर गेले की मला भीती असायची ते जिवंत घरी येतील की नाही”.
यापुढे बोलताना जॉनी लीव्हरने खुलासा केला की तो १३ वर्षांचा असताना आत्महत्या करणार होता. वडिलांच्या जाचाला कंटाळून त्याने रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्याने खुलासा केला की, जेव्हा ट्रेन त्याच्या दिशेने येत होती, तेव्हा त्याच्या तीन बहिणींचे चेहरे त्याच्या डोळ्यांसमोर चमकले आणि त्याने त्याचा हा निर्णय बदलला. जॉनी म्हणाला, “वयाच्या १३व्या वर्षी मी रेल्वे रुळावर आत्महत्या करायला गेलो होतो. मी माझ्या वडिलांना कंटाळलो होतो. मी रुळावर गेलो, समोरुन एक ट्रेन येत होती, अचानक माझ्या तीन बहिणींचे चेहरे समोर आले आणि माझ्या मनात आलेला हा विचार बदलला”.