Reshma Shinde Birthday : सिनेविश्वात सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत असतानाच मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा अभिनेत्री रेश्मा शिंदे नुकतीच लग्नबंधनात अडकली. रेश्मा शिंदेच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. अभिनेत्रीच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. बरेच दिवसांपासून रेश्माच्या लग्नाची चर्चा सुरु होती. थेट केळवणाचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने लग्न बंधनात अडकणार असल्याची जाहीर कबुली साऱ्यांसमोर दिली. मात्र त्यावेळी तिने तिच्या नवऱ्याचे नाव व चेहरा गुलदस्त्यात ठेवला होता. यानंतरअभिनेत्रीने थेट हळदी समारंभादिवशी तिच्या नवऱ्याचा फोटो शेअर करत ‘आमची हळद’ असं म्हणत हळदी समारंभातील खास फोटो शेअर केले.
रेश्मा शिंदेचा विवाहसोहळा २९ नोव्हेंबरला पुणे येथे थाटामाटात पार पडला. अभिनेत्रीच्या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील असंख्य कलाकार उपस्थित होते. लग्नानंतर आता अभिनेत्रीचा पहिला वाढदिवस आहे. वाढदिवसादिवशी अभिनेत्री नवऱ्यासह देवदर्शनाला पोहोचली. लाडक्या बायकोच्या वाढदिवशी पवनने खास फोटो पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये रेश्मा नवऱ्यासह राघवेंद्र स्वामींच्या मंदिरात दर्शन घेताना दिसली.

राघवेंद्र स्वामींच्या मंदिरात दर्शन घेतानाचा फोटो पवनने शेअर केला आहे. “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ಹೆಂಡತಿ. देवाच्या आशीर्वाद कायम तुझ्या पाठिशी राहूदेत. प्रेम, आनंद, उत्तम आरोग्यासह तुझ्या आयुष्यात कायम भरभराट येऊदे.” अशी पोस्ट पवनने रेश्मासाठी केली आहे. पवनने कॅप्शनमध्ये वापरलेला कन्नड शब्द साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या ‘ಹೆಂಡತಿ’ कन्नड शब्दाचा अर्थ पत्नी, बायको असा होता. बायकोच्या लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसाला पवनने केलेली पोस्ट लक्षवेधी ठरली.
रेश्मा व पवनचा विवाहसोहळा पारंपरिक मराठी पद्धतीने आणि त्यानंतर दाक्षिणात्य पद्धतीने पार पडला. या दोन्ही लूकचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, तिच्या कामाबद्दल बोलायच झालं तर ती सध्या ‘स्टार प्रवाह’वरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तर ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेमुळे रेश्माला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.