अभिनेत्री राणी मुखर्जी ही हिंदी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री आहे. नुकताच तिचा ४६ वा वाढदिवस पार पडला. १९९७ साली तिने ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रांमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका स्वीकारल्या. प्रेक्षकांची तिला खूप पसंती मिळाली. ‘कुछ कुछ होता है’, ‘ साथिया’, ‘पहेली’ या चित्रपटांमधील तिच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. २०१२ साली ती दिग्दर्शक व निर्माता आदित्य चोप्राबरोबर लग्नबंधनात अडकली. तिला आदिरा नावाची मुलगी आहे. पण सध्या ती दुसऱ्या बाळाच्या वेळी झालेल्या गर्भपातावर व्यक्त झाली आहे. (rani mukharji on childrens)
नुकताच तिने ‘गैलाटा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या गर्भपातावर भाष्य केले आहे. तिने सांगितले की, “मी माझ्या दुसऱ्या मुलासाठी खूप प्रयत्न केले. माझी मुलगी आता आठ वर्षाची आहे. तिच्या जन्मानंतर लगेचच आम्ही दुसऱ्या बाळासाठी प्रयत्न केले. आम्ही प्रयत्न करत राहिलो. मी गरोदर राहिले पण काही कारणांनी मी माझ्या बाळाला गमावले”.
पुढे ती म्हणाली की, “माझ्यासाठी तो खूप कठीण काळ होता. माझं वय आता मूल जन्माला घालण्याचं नाही. पण मला हे नेहमी वाटत राहत की आदिरासाठी आम्ही भाऊ-बहीण आणू शकलो नाही. मला वाईटही वाटते पण मग मला वाटतं की आपल्याजवळ जे आहे त्यामध्ये आपण समाधानी असावं. माझ्यासाठी आदिरा सर्वकाही आहे. माझ्याकडे ती आहे पण असे अनेक आई-वडील आहेत ज्यांना एकही मुलं नसतं. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते”. पण तिच्या गर्भपाताचे मूळ कारण हे वय असल्याचेही तिने सांगितले.
राणी व आदित्य यांनी आदिराला २०१५ साली जन्म दिला. पण दोघांनीही आपल्या मुलीला माध्यमांपासून दूरच ठेवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार राणी एक पुस्तक लिहीत आहे. या पुस्तकात आदित्य चोप्रा व तिच्या नात्याबद्दल सविस्तर लिहिण्यात आल्याचे सांगितले जात आहे.