हल्ली सोशल मीडियाचा वापर अगदी सर्रास वाढला आहे. लहांनांपासून् ते अगदी थोरांपर्यंत हल्ली सगळेच सोशल मीडियाचा वापर करतात. त्यात कोरोनाच्या काळापासून तर सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात कलाकार मंडळीही सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. एक काळ होता, जेव्हा चाहते मंडळी आपल्या आवडत्या कलाकाराला एखाद्या चित्रपट प्रदर्शनानंतरच भेटायचे. पण सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात अनेक कलाकार त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहू शकतात. याशिवाय कलाकारांनाही सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहायला आवडते.
मात्र सोशल मीडियाच्या या जमान्यात मनोरंजन् विश्वात असे काही कलाकार आहेत, जे सोशल मीडियापासून लांब आहेत. अनेक कलाकार आजही सोशल मीडियाचा वापर करत नाही. त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे राणी मुखर्जी. राणी मुखर्जी गेले अनेक वर्ष मनोरंजन सृष्टीत कार्यरत असून ती फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा ट्विटरसह कोणत्याच सोशल मीडियावर नाही. पण ती सोशल मीडियावर का नाही याबद्दल स्वत: अभिनेत्रीने तिचे उत्तर दिले आहे.
सोशल मीडियापासून दूर राहण्याबाबत राणी मुखर्जी असं म्हणते की, “मी प्रत्येक गोष्टीत माझे सर्वोत्तम देते आणि मला असं वाटतं की मी या सोशल मीडियावर माझे १०० टक्के देऊ शकणार नाही. याशिवाय, मला जास्तीचा भार उचलायचा नाही आणि मला साधे जीवन जगायला आवडतं. त्यामुळे मी सोशल मीडियापासून दूर आहे”.
यापुढे राणीने असं म्हटलं की, “सध्या मी जिथे आहे तिथे खूप खूश आहे. लोक माझे चित्रपट आवर्जून पाहायला जातात, त्यामुळे मी एक अभिनेत्री म्हणून स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या अभिनयात सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून चाहते कधीही निराश होणार नाहीत”.
दरम्यान, राणी मुखर्जीच्या कामाबदल बोलायचे झाले तर ती नुकतीच ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ मध्ये दिसली होती. तसेच ती नुकतीच अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंन्क्शनमध्येही दिसली होती. यावेळी ती मुलगी आदिराबरोबर या कार्यक्रमात सहभागी झाली होती. दोघांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.