मुकेश अंबानी व नीता अंबानी यांच्या धाकट्या लेकाच्या प्री-वेडिंग फंक्शनची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. गुजरात जामनगर येथे आयोजित अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा विवाहपूर्व सोहळा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला. अनेक क्षेत्रातील सेलिब्रिटी या सोहळ्यासाठी उपस्थित होते. अंबानी कुटुंबांच्या पाहुण्यांच्या यादीमध्ये, बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी तिची मुलगी आदिरा चोप्रासह एका व्हिडीओमध्ये दिसली. कधीही आपल्या मुलीला कॅमेऱ्यासमोर न आणणाऱ्या राणीच्या मुलीचं अखेर दर्शन घडले. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ती साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्यासह बोलताना दिसली. (Rani Mukerji Daughter)
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शन्सच्या दुसऱ्या दिवशी राणी मुखर्जी तिची ८ वर्षांची मुलगी आदिरासह एका व्हायरल व्हिडीओमध्ये दिसली. राणीने आदिरा यांची रजनीकांतशी ओळख करुन दिली. सोनेरी रंगाची साडी नेसलेली राणी खूप सुंदर दिसत होती. तर आदिराही तिच्या आईप्रमाणे पारंपरिक अंदाजात होती. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये रजनीकांत हात जोडत नतमस्तक झाले आणि आदिराशी बोलले.
राणी व तिच्या लेकीच्या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. राणी मुखर्जीने आतापर्यंत आपल्या मुलीला कॅमेरा व सोशल मीडियाच्या ग्लॅमरपासून दूर ठेवले आहे. मीडियाच्या झगमगीत दुनियेपासून आदिराला संरक्षण देऊनही तिची झलक वेळोवेळी समोर आली आहे. त्यामुळेच आदिराची ही क्लिप लोकांच्या पसंतीस उतरत आहे. आदिरा इतकी मोठी कधी झाली, अशा अनेक कमेंट प्रेक्षक करत आहेत.

‘कॉफी विथ करण’च्या अलीकडच्या सीझनमध्ये, राणीने आदिराला लाइमलाइटपासून दूर ठेवण्यासाठी तिच्या निवडीबद्दल खुलासा केला. ती म्हणाली, “आदिराच्या जन्मापासून मी सर्व पापाराझी व मीडियामधील लोकांचे आभार मानते. ते माझ्यावर प्रेम करतात. आदि (आदित्य चोप्रा) कसा आहे हे त्यांना माहीत आहे. हा आमचा एकत्रित निर्णय होता, आम्हाला आदिराचा फोटो काढायचा नव्हता कारण आम्हाला आदिराला कसे वाढवायचे आहे याची आमच्या डोक्यात वेगळी कल्पना होती. आणि असं केल्याने तिला कुठेही विशेष वाटणार नाही याची आम्ही काळजी घेतली”, असंही ती म्हणाली.