Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’चा फॅमिली वीक विशेष चर्चेत राहिला. विकी जैनची आई व अंकिता लोखंडेची सासू ‘बिग बॉस’च्या घरात या फॅमिली वीकदरम्यान आल्यानंतर विशेष चर्चा रंगली. यावेळी अंकिताच्या सासूबाईंनी अंकिताला बोल लगावले, त्यानंतर सर्वांनी रंजना जैन यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. रश्मी देसाईपासून ऐश्वर्या शर्मापर्यंत तसेच इतर कलाकारांनी अंकिताला साथ दिली. अशातच आता राखी सावंतनेही एक व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओमधून राखीने अंकिताच्या सासूला खायला प्यायला सांगत मजा करायला सांगितलं आहे. शिवाय कैकेयी होऊ नको असा सल्ला दिला आहे.
राखी सावंतने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करुन अंकिता लोखंडेला ‘बिग बॉस १७’ ची विजेती म्हणून घोषित केले. तसेच तिच्या सासूबाईंना चार गोष्टी सांगितल्या. व्हिडीओमध्ये राखी सावंत असं म्हणत आहे की, “हॅलो फ्रेंड्स, मला अंकिताच्या सासूला सांगायचे आहे की, सासूही एकदा सून होती. पती-पत्नीमध्ये तुम्ही का येताय? एकदा तुमच्या मुलाने तुमच्या सूनेचा हात धरून लग्न केले, मग तुम्ही त्यांच्या भांडणात का पडत आहात? सासूबाई शांत राहा. खा-प्या, मजा करा” असं म्हटलं आहे.
राखी सावंत पुढे म्हणाली, “अंकिता ही ट्रॉफी काही करुन जिंकणार आहे. अंकिता ‘बिग बॉस’ जिंकणार आहे. आणि हा माझा अंदाज आहे. राखी सावंतचा अंदाज. आमची मराठी मुलगी अंकिता जिंकणार आहे. मग तुम्हाला खूप आनंद होईल की माझी सून जिंकली, माझी सून जिंकली. अहो अंकिताच्या सासूबाई, असं करू नका. शांतपणे बसा. तुमचा मुलगा व सून यांच्यात बोलू नका. सूनेचा आदर करा. मग तुमच्या मुलीचाही सन्मान होईल” असंही ती म्हणाली.
राखी सावंत पुढे रंजना जैन यांना म्हणाली, “अंकिता माझी बहीण आहे. मी घरी आले तेव्हा आपली भेट झाली होती. तेव्हा तुम्ही तर मला देवासमान वाटल्या होता. मग आता असं अचानक काय झालं? आई, कैकेयी होऊ नका. घर वाचवा. घर फोडू नका. आई, त्या दोघांचे घर तोडू नकोस. दोघांचं घर वाचव. मी आल्यावर भेटेन तुम्हाला. माझं डोकं फरवू नका. विकी जीजू खूप चांगला मुलगा आहे. चांगला नवरा आहे. त्याला प्रेमाने सांगा की त्याच्या पत्नीला आधार दे. हे ‘बिग बॉस’चं घर आहे. इथे वाद व मारामारी होतंच असतात. यात काय मोठं आहे. ती तुमची सून आहे. सून नाही तर ती तुमची मुलगी आहे. आई तिला प्रेमाने वागवा” असंही तिने म्हटलं आहे.