१००व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या नाट्यसंमेलनाला अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली. त्याचबरोबर काही राजकीय मंडळींनीही या नाट्यसंमेलनाला उपस्थिती दर्शवली. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेही या संमेलनाला आवर्जुन गेले होते. यादरम्यान त्यांची एक खास मुलाखत घेण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांनी मराठी कलाकरांना चांगलंच सुनावलं. तसेच एकमेकाला मान न देण्यावरुनही खडसावलं. शिवाय कलाकारांच्या काही चुकाही सांगितल्या. यावेळी प्रिया बेर्डे, सिद्धार्थ जाधव यांसारखे कलाकार उपस्थित होते.
राज ठाकरे म्हणाले, “आपण कृपया वाईट वाटून घेऊ नका. बाहेरच्या कलाकारांना जेव्हा मी भेटतो आणि आपल्या कलाकारांशी जेव्हा माझी भेट होते. तेव्हा मला काही चुका जाणवतात. त्या मला आज सांगायच्या आहेत. मी जे बोलत आहे ते कृपया करुन ऐका. पहिली आणि शेवटची गोष्ट ती म्हणजे तुम्ही एकमेकांना मान दिला नाहीत, तर लोक तुम्हाला मान का देतील? तुम्ही एकमेकांना लोकांसमोर, अद्या, फद्या, शेळ्या, मेंढ्या, अंड्या अशा काही नावांनी हाका मारता. आज मराठीमध्ये बरेच कलावंत आहेत. पण मराठी चित्रपटांना स्टार नाही.”
“टेलिव्हिजन कार्यक्रमातही एकमेकांना काहीही बोलतात. रजनीकांत व इलायराजा जे साऊथमध्ये मोठे संगीतकार आहेत. दोघंही रात्री एकत्र बसून दारु पित असतील. पण मंचावर आल्यानंतर ते प्रत्येकाला सर म्हणून आदराने हाक मारतात. त्यांची मैत्री चार भिंतीच्या आतमध्ये कितीही घट्ट असली तरी ते एकमेकांचा बाहेर आदर करतात. ही गोष्ट मराठी कलाकारांनी लक्षात ठेवावी. तुम्ही एकमेकांना लोकांसमोर मान दिलात तर तो मान लोकांकडून मिळेल अन्यथा मिळणार नाही. तुम्ही जर नाक्यावर उभे असाल तर तुम्हाला पैसे देऊन कोणीही बघायला येणार नाही.”
“मला आजपर्यंत अशोक सराफ कधी कोणत्या नाक्यावर उभे राहिलेले दिसले नाहीत. म्हणूनच पैसे खर्च करुन मी त्यांना बघायला जाणार. जे सहज मला दिसत आहे जे सहज मला मिळत आहे ते मी पैसे काढून का बघायला जाणार? तुम्ही इतरांना मोठं म्हटलं पाहिजे तर इतर लोक तुम्हाला मोठं म्हणतील. मी मागे अशोक सराफांच्या कार्यक्रमाला गेलो होतो तिथे मी त्यांना अशोक सर म्हणूनच हाक मारली. त्यांना आपण काय म्हणायचं, मामा आले आहेत का?. तुझे ते सख्खे मामा लागतात का? इतका मोठा कलावंत आहे ना मग म्हण ना अशोक सर. तुमची आपुलकी ही चार भिंतींमध्येच ठेवा. एकमेकांना मान दिलात तरच नाट्य व चित्रपटसृष्टीचं पुढे चांगलं भविष्य आहे”. राज ठाकरे यांनी अगदी पोटतिडकीने कलाकारांना गोष्टी समजावून सांगितल्या.