मराठी सिनेसृष्टीतील बरीच कलाकार मंडळी सध्या अजून अभिनयक्षेत्राबरोबर इतर क्षेत्रातही पदार्पण करताना दिसत आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्री श्रेया बुगडे हिने देखील अभिनयाबरोबर स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. अभिनेत्रीने स्वतःचं नवं हॉटेल सुरू केले असून बिग फिश या नावानं हे सीफूड हॉटेल खवय्यांसाठी मेजवानी आहे. याशिवाय सेनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांनी अभिनयाबरोबरच त्यांचा साईड बिजनेस सुरू केला आहे. (Tushar Deval And Swati deval)
अनघा अतुल, सुप्रिया पाठारे या कलाकार मंडळींची नावे यात आवर्जून घेतली जातील. या पाठोपाठ आता आणखी एका कलाकार जोडीने खवय्यांसाठी मेजवानी तयार केलेली पाहायला मिळत आहे. चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील एका कलाकाराने पत्नीसह हा व्यवसाय सुरू केला आहे. त्याची दखल आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली असून या कलाकाराचं कौतुक केलं आहे.
लोकप्रिय संगीत संयोजक व संगीतकार तुषार देवल व अभिनेत्री स्वाती देवल यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी खाद्यसंस्कृती जोपासण्याकरिता बोरिवली पूर्व येथे सुरू असलेल्या भव्य मिसळ महोत्सवात सहभाग घेतला आहे. या मिसळ महोत्सवात तुषार व स्वातीने ‘देवल मिसळ’ स्टॉल लावला आहे. या स्टॉलला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट दिली. हा प्रसंग तुषारने सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.
तुषारने राज ठाकरेंबरोबरचा फोटो पोस्ट करत पोस्ट शेअर केली आहे. तुषार म्हणाला, “पहिल्यांदाच राज साहेबांना एवढ्या जवळून बघितलं. त्यांना आमच्या मिसळी विषयी सांगितलं आणि त्यांनी खांद्यावर हात ठेऊन शुभेच्छा दिल्या.बस्स…अजून काय पाहिजे. एवढ्या गर्दीत २ शब्द ऐकून घेतल्याबद्दल राज साहेबांचे मनापासून धन्यवाद.” असं म्हणत त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.