दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली होती आणि हा अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या अवघ्या ३ दिवसांत कामाईचे अनेक विक्रम केले. मात्र पहिल्याच दिवशी या चित्रपटाच्या यशाला गालबोट लागले. या चित्रपटाच्या प्रीमियरला झालेल्या चेंगराचेंगरीत एक महिलेचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल आता अभिनेता आणि दिग्दर्शक सुकुमार यांनी शनिवार ७ डिसेंबर रोजी संध्याकाळी झालेल्या एका कार्यकर्मात माफी मागितली. तसंच मृत महिलेच्या कुटुंबाप्रती संवेदनाही व्यक्त केल्या. (Pushpa 2 premiere woman death)
महिलेच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना सुकुमार म्हणाले, “जे काही घडले त्यामुळे मला खूप दु:ख झाले. याचा मला खूप खेद वाटतो. मी कुटुंबाची माफी मागतो. आणि मी खात्री देतो की, आम्ही तुम्हाला सदैव साथ देऊ”. यापुढे ते म्हणाले, “मी या चित्रपटावर सहा वर्षांहून अधिक काळ काम केले आहे, पण गेल्या तीन दिवसांपासून मी खूश नाही कारण दिग्दर्शक हा नेहमीच संवेदनशील असतो. मी तीन वर्षे काम करतो किंवा सहा वर्षे… पण मी कोणाचेही आयुष्य घडवू शकत नाही”. अल्लू अर्जुनने या घटनेवर माफीही मागितली आणि भावना व्यक्त केल्या.
याबद्दल बोलताना अभिनेता अल्लू अर्जुन असं म्हणाला की, “त्या घटनेचे आम्हाला दु:ख आहे. आम्हाला खरोखर काय झाले हे माहित नाही. मी गेल्या २० वर्षांपासून हे करत आहे. मी उद्घाटनाच्या दिवशी थिएटरमध्ये जातो. पण हे असं घडणे अत्यंत दुर्दैवी आहे. मी चित्रपट पाहिला आणि मला मध्यातच निघून जावे लागले कारण व्यवस्थापनाने मला समस्या असल्याचे सांगितले. आणि मग दुसऱ्या दिवशी रेवतीचा मृत्यू झाल्याचे समोर आले. यामुळे मला धक्काच बसला”.
यापुढे अभिनेत्याने हे देखील स्पष्ट केले की, सार्वजनिकपणे प्रतिक्रिया देण्यासाठी त्याला दोन दिवस का लागले. याबद्दल तो म्हणाला की, “मला मानसिकदृष्ट्या प्रतिसाद द्यायला वेळ लागला, कारण मला आधी स्थिर होऊन त्याच ठिकाणी परत यायचे होते. प्रत्येक गोष्टीवर प्रक्रिया करण्यासाठी मला वेळ लागतो. तिथे काय घडलं हे कळल्यावर आम्ही सगळे थक्क झालो. ही घटना ऐकताच आमची उर्जा गेली होती”.
दरम्यान अल्लू अर्जुनने या महिलेच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे. याबद्दल तो म्हणाला की, “मी २५ लाख रुपये दिले आहेत. त्यांची नुकसान मी कधीच भरून काढू शकणार नाही. पण ही मी एक मदत त्यांना करत आहे. तिचे पती यातून बरे झाल्यावर मी त्यांची भेट घेईन आणि त्यांना शक्य ती सर्व मदत करेन”.