जो जोनास आणि सोफी टर्नरच्या घटस्फोटाची चर्चा सर्वत्र पसरली आहे. त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चेनंतर आता पुन्हा एकदा सोफी टर्नर चर्चेत आली आहे. जो जोनासपासून घटस्फोट घेतल्यानंतर सोफी टर्नरने आता निक जोनासची पत्नी प्रियांका चोप्राला अनफॉलो केले आहे. चार वर्षांच्या लग्नानंतर जो व सोफीने गेल्या महिन्यात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर या विभक्त जोडप्याने त्यांच्या दोन मुलींना त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची परवानगी देऊन एक संकल्प केला.
सोफी टर्नरने प्रियांका चोप्राला इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं असलं तरी ती अजूनही जो, केविन आणि त्याची पत्नी डॅनियल जोनासला फॉलो करत आहे. प्रियांकाने जो आणि सोफीच्या सुरू असलेल्या घटस्फोटावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सोफी टर्नरने प्रियंकाला अनफॉलो केल्यानंतर प्रियंकानेही सोफीला अनफॉलो केलं. (Sophie Turner On Priyanka Chopra)
सूत्रांच्या माहितीनुसार अशी बातमी अमोर आली होती की, प्रियांकाला जो व सोफीच्या ब्रेकअपला सामोरे जाणे कठीण जात होतं. एका जवळच्या सूत्रानुसार, ‘ती सोफीच्या खूप जवळ होती. एक वेळ अशी होती जेव्हा सोफीला वाटले की ती व जो लंडनला जातील आणि निक व प्रियांकाही त्यांच्यासोबत लंडनला येतील. ‘लाइफ अँड स्टाईल’नुसार, सूत्राने सांगितले की, ‘प्रियांका सोफी आणि तिच्या मुलींवर प्रेम करायची.’
याआधीही सोफी व प्रियांकाने अनेक मुलाखतींमध्ये त्यांच्या बॉन्डिंगबद्दल भाष्य केलं आहे. २०२० च्या एका मुलाखतीत, सोफी म्हणाली होती की, ‘प्रीसोबत हा एक प्रकारचा वेडेपणा आहे. तिला स्वतःला आठवण करून द्यावी लागेल की बॉलीवूडमध्ये तिची २० वर्षांची कारकीर्द आधीच आहे. ती सध्या भारतातील सर्वात मोठी अभिनेत्री आहे. जेव्हा आम्ही तिच्या व निकच्या लग्नासाठी तिथे गेलो होतो तेव्हा आमच्यासाठी तिथे राजेशाही थाट होता.”
प्रियांका व सोफी यांच्या घट्ट बॉण्डिंग असूनही या दोघींमध्ये असं नेमकं काय बिनसलं ज्यामुळे त्यांनी एकमेकींना अनफॉलो केलं याच कारण अद्याप समोर आलेलं नाही. सोफी व जोच्या घटस्फोटानंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. मुलींच्या कस्टडीवरून दोघांमध्ये सुरू असलेल्या वादाचं निरसन व्हावं, यासाठी प्रियांका प्रयत्न करत असल्याची माहितीही समोर आली आहे.