मराठी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांनी त्यांचा सिनेसृष्टीपर्यंतचा प्रवास अथक प्रयत्नांनी पार पाडला आहे. सिनेसृष्टीत कोणीही वारसा नसताना असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांची सिनेसृष्टीतील स्वतःची जागा स्वतः निर्माण केली आहे. अशीच कठोर परिश्रम करून सिनेसृष्टीत नाव कमावणारी गायिका म्हणजे वैशाली माडे. आज शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांपैकी एक अशी वैशालीची ओळख आहे. आवाजाच्या जादूने तिने लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. (Vaishali Made Struggle)
वैशाली ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या यंदाच्या सीझनमध्ये परिक्षक म्हणून पाहायला मिळाली. गेली १७ वर्षे वैशाली इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे, दरम्यान तिला अनेक संकटांचा सामना करावा लागला. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर वैशालीच्या कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी वैशालीच्या करिअरसंदर्भात, आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, तिच्या वाटेत आलेल्या अडचणी याबद्दलही वैशालीने मनमोकळेपणाने भाष्य केलं.
घरातील आर्थिक परिस्थितीबाबत बोलताना वैशाली म्हणाली, “आम्ही जिथे राहत होतो तिथे लाइट नव्हती. घरची परिस्थितीही इतकीही नव्हती की घरात दोन रॉकेलचे दिवे लावता यावेत. घरात एकच रॉकेलचा दिवा असायचा. आई या रॉकेलच्या दिव्याच्या प्रकाशात स्वयंपाक करायची आणि मी तिच्या मागे रियाझ करत बसायचे. असं एकंदर घरातलं वातावरण होतं. माझे पहिले गुरू हे माझे वडील होते. ते मला भजण आणि भक्तीगीते शिकवायचे, असं वैशालीनं सांगितलं.
तसेच, भूतकाळाबद्दल बोलताना वैशाली भावुक झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. आणि पाणावलेल्या डोळ्यांनी ती म्हणाली की, “मी भूतकाळात रमत नाही, त्या आठवणीही नको वाटतात, त्या दिवसांत खूप काही घडलं, दु:खच जास्त होतं. जेव्हा कधी मी ते आठवते तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी येतं. ते खूप अवघड दिवस होते. असेही दिवस होते की, जेव्हा मी रात्रभर रडायचे आणि पुन्हा सकाळी नव्याने जगायचे. जगणं सोपं नाहीये, पण माझ्या आवाजानं, माझ्या कलेनं मला जगवलं”, असं वैशाली म्हणाली.