‘सारेगमप’च्या ‘लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेले मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची कबुली दिली. ‘आमचं ठरलंय’ म्हणत त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केला होता. त्यानंतर आता हे जोडपं लग्नबंधनात कधी अडकणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. हे दोघे सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते एकमेकांबरोबरचे अनेक व्हिडीओज, फोटोस सोशल मीडियावरून शेअर देखील करतात. (Mugdha And Prathamesh Shared Video)
सोशल मीडियावरून ते एकत्र गाणं गातानाचे अनेक व्हिडीओ शेअर करत असतात. दरम्यान या व्हिडिओला प्रेक्षकांचीही पसंती मिळते. अशातच प्रथमेश व मुग्धा यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या दोघांनी शेअर केलेला गाणं गातानाचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुग्धा प्रथमेशने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दोघांनीही ‘ओ रंगरेज’ या गाण्यावर सूर धरलेला पाहायला मिळतोय. बरं हे गाणं ते दोघेही प्रवासादरम्यान म्हणताना दिसत आहेत.
मुग्धा व प्रथमेश यांनी प्रवासादरम्यान गाणं गातानाचा शेअर केलेला व्हिडीओ पाहून अनेकांनी नाराजी दर्शविली आहे. कारण या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की, मुग्धा ही गाडी चालवत आहे. आणि गाडी चालवत असतानाच ते दोघे गाणं गातानाचा व्हिडीओ बनवत आहेत. गाडी चालवताना हे कृत्य केल्याने त्यांच्या जीवाला धोका असल्याने अनेकांनी कमेंट करत मुग्धा व प्रथमेशला चांगलेच धारेवर धरले आहे.
मुग्धा व प्रथमेशच्या आवाजाची जादू साऱ्यांनाच माहित आहे. अशातच सोशल मीडियावरून त्यांनी ड्राइव्ह करताना बनवलेला व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट करत त्यांना योग्य असा सल्ला दिला आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “सुंदर पण ड्राईव्ह करताना हे सगळं नको”. तर आणखी एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “आधी गाडी नीट चालवा एका ठिकाणी गाडी थांबवून व्हिडीओ तयार करा, चालत्या गाडी मध्ये असे प्रयोग नका करू.” अनेकांनी या व्हिडिओला पसंती दर्शविली आहेच, तर अनेकांनी या व्हिडिओला पाहून गाडी चालवता सेफ्टीचा विचार आधी करा असा सल्लाही दिला आहे.