Premachi Goshta Promo : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका बरेच दिवसांपासून चर्चेत आहे. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळते. मालिकेत तेजश्री प्रधान व राज हंचनाळे हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले. मात्र आता तेजश्रीने ही मालिका सोडली असल्याचं समोर आलं आहे. बरेच दिवसांपासून तेजश्री मालिकेत काम करणार नसल्याचं चर्चेत होतं. त्यानंतर अखेर अभिनेत्रीने मालिका सोडली असल्याचं समोर आलं. अभिनेत्रीने ही मालिका का सोडली याचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही. तेजश्रीच्या ऐवजी आता मुक्ताच्या रुपात नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली असल्याचं समोर आलं आहे. याचा एक प्रोमोदेखील समोर आला आहे.
तेजश्रीने मालिकेतून एक्झिट घेतल्यावर अभिनेत्री स्वरदा ठिगळे मुक्ताच्या भूमिकेत झळकणार असल्याचं समोर आलं आहे. स्वरदाने सेटवरचा पहिला फोटो शेअर करत या वृत्ताला दुजोरा दिला होता. “नवीन वर्ष, नवीन सुरुवात” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने मालिकेच्या स्क्रिप्टचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर आता अखेर स्वरदा मुक्ताच्या भूमिकेत असल्याचा मालिकेतील प्रोमो समोर आला आहे. यामध्ये नव्या मुक्ताची झलक पाहायला मिळतेय.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये, “सागर कोळी यांना कधीच मुलगी नको होती. सईच्या जन्माआधी अबॉर्शनचा विचारही केला होता”, ही टेलिव्हिजनवरील बातमी ऐकून सईचा राग अनावर होतो. आणि सई सरळ घरातून निघून येते. रस्त्यावर रडत रडत चालत असताना मागून एक गाडी येत असते याचंही तिला भान नसतं. सईचा अपघात होणार इतक्यात सई जोरात मुक्ताई असं किंचाळते. तितक्यात तिथे मुक्ता येते आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सईला बाजूला खेचते. यावेळी नव्या मुक्ताचा चेहरा प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. मालिकेतील नव्या मुक्ताची झलक या प्रोमोमध्ये पाहायला मिळाली असून प्रेक्षकवर्ग या नव्या मुक्तावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.
यापुढे ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत मुक्ता ही भूमिका स्वरदा ठिगळे साकारणार आहे. अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर २०१३ मध्ये प्रसारित होणाऱ्या ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. २०१७ मध्ये तिने हिंदी मालिकेत काम केलं होतं. याशिवाय ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत स्वरदा प्रमुख भूमिकेत झळकली होती. आता लवकरच स्वरदा प्रेक्षकांना मुक्ताच्या भूमिकेत दिसेल.