Utkarsh Shinde Shared Goodnews : सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे व त्यांच्या कुटुंबीयांनी आजवर आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. शिंदे कुटुंबातील गायकांनी गायलेली गाणी कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी आहेत. शिंदे कुटुंबीय गायकीचा वारसा पुढे नेत आहेत. आनंद शिंदे, मिलिंद शिंदे आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे हा वारसा जोपासत आहेत. यापैकी अभिनेता व गायक उत्कर्ष शिंदे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. ‘बिग बॉस मराठी’मधून तो विशेष लोकप्रियतेस आला. सोशल मीडियावर उत्कर्ष बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो. अशातच उत्कर्षने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे.
अभिनेत्याने व गायकाने आई-वडिलांनी खरेदी केलेल्या जमिनीत भर घालत आणखी काही जमीन खरेदी केली असल्याचं सांगितलं आहे. तर ही जमीन त्याने एकट्याने नाही तर त्याच्या दोन्ही भावांसह मिळून घेतली आहे. थेट कुटुंबाबरोबरचा शेतातील फोटो पोस्ट करत उत्कर्षने ही आनंदाची बातमी दिली. त्याखाली कॅप्शन देत त्याने असं म्हटलं की, “शेती विकली नाय तर राखली आणि आता वाढवली. पिढ्या पुढे सरकतात, वारसा पुढे जातो, वडिलोपार्जित कोणाला धन, कोणाला पैसा, कोणाला घर, जागा तर कोणाला मळा मिळतो. आम्हाला आमच्या पूर्वजांकडून मेहनत करुन नाव कमवायचे संस्कार मिळाले. पिढ्यांना पिढ्याची, रसिकांच्या प्रेमाची शक्ती आणि त्याच शक्तीच्या जोरावर आज आमच्या शिंदे नावाचं शिंदेशाही घराणं झालं”.
पुढे त्याने लिहिलंय, “दुष्काळातून पळ काढत पिढ्या जगण्याचा मार्ग शोधत मुंबईकडे आल्या. जमेल ते काम करत कला जोपासत रखरखत्या रस्त्यावर फिरत- फिरत आज रेड कारपेटपर्यंत प्रवास पोहोचला. रसिकांनी नावारुपाला आणून शिखरावर पोहोचवलं पण आई- वडिलांना गावात शेतजमीन नसल्याचं खंत, दुःख वाटायचं. अखेर त्यांनी ते स्वप्न पूर्ण केलं. विजया शिंदे, आनंद शिंदे या आई-वडिलांनी त्यांच्या नावाची हक्काची शेत जमीन घेतली. आम्ही शहरात शिकलो, वाढलो आणि नावारुपाला आलो पण गावच्या मातीचा विसर कधीच पडला नाही. ती शेतजमीन आम्ही मुलांनी टिकवली, जपली आणि आता हर्षद, आदर्श, उत्कर्षने ती आणखीन २०२५ वर्षामध्ये वाढवली”.
यापुढे उत्कर्षने असंही म्हटलंय की, “जागा वाढलीच पाहिजे. ज्या मंगळवेढे गावाने आम्हाला पिढ्यांपिढ्या माया दिली त्याच आमच्या गावात आज डॉ.आंबेडकरांच्या पुण्याईने उत्कर्ष, आदर्श, हर्षदचं नवीन फार्म लँड ही झालं. हे २०२५ नववर्ष नव चैतन्य घेऊन आलं आहे हे नक्की. तुमच्या आशिर्वादाने हे वर्ष ही गाजवूच. आमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभार. तुम्हा सर्वांना हे वर्ष उत्कर्षाचे जाओ हिच प्रार्थना. मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप शुभेचा”.