रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेने देशभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेचे निर्माते आता पुन्हा एकदा ‘रामायण’ वेगळ्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याची तयारी करत आहेत. रामानंद सागर यांचा मुलगा प्रेम सागर यांनी एका मुलाखतीमध्ये नवीन मालिका आणणार असल्याची घोषणा केली आहे. पण या रामयणामध्ये नक्की काय दाखवले जाणार? रामाची भूमिका कोण करणार? याबद्दल मात्र त्यांनी खुलासा केला नाही. कोरोना काळामध्ये ‘रामायण’ ही मालिका पुन्हा प्रसारित करण्यात येत होती. तब्बल २० वर्षांनीदेखील तोच प्रतिसाद मिळाला होता. चाहत्यांचे हे प्रेम लक्षात घेऊनच नवीन ‘रामायण’ आणण्याबद्दलची घोषणा करण्यात आली आहे. (Prem Sagar on Ramayana serial)
‘इटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रेम सागर यांनी सांगितले की, “आम्ही नवीन ‘रामायण’ आणण्याचा विचार करत आहोत. या ‘रामायणा’साठी आम्ही नवीन राम शोधत आहोत. यासाठी आमची संपूर्ण टीम दिवसरात्र मेहनत करत आहे. आमचा योग्य राम सापडला की आम्ही लगेचच त्याची घोषणा करु”.
ते पुढे म्हणतात की, “आम्ही एक नवीन राम शोधत आहोत. आम्हाला असा राम हवा आहे ज्याने याआधी कधीही रामाची भूमिका केलेली नसेल. पण माझ्या मनात भगवान राम यांची जी प्रतिमा आहे अगदी तसाच राम या मालिकेसाठी घेतला जाईल. राम हे भगवान विष्णुंचा अवतार आहेत जे कधीही स्वतः देव असल्याचे सांगत नाहीत”. तसेच त्यांनी दिग्दर्शनाबद्दल सांगितले की, “मी यामध्ये पूर्णपणे निपुण होईनच. पण या मालिकेच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन दूसरा दिग्दर्शक करेल. तांत्रिक बाबतीतही जुन्या रामायणामधील कोणीही व्यक्ती या ‘रामयणा’मध्ये नसेल”.
या मालिकेच्या आव्हांनांबद्दल प्रेम सागर म्हणाले की, “लोक आधीच्या रामयणाची आणि आताच्या रामयणाची तुलना करतील. पण मला याची चिंता नाही. मला असं वाटतं की, हे माझं भाग्य आहे. रामाला विष्णुच्या अवतारात आणण्याचे मी केवळ एक माध्यम आहे”. पुढे प्रेम सागर यांनी सांगितले की, “काही लोक मला ईमेल पाठवत आहेत. त्यारात्री मला अचानक काहीतरी लिहावं अशी कल्पना सुचली. कोणीतरी महान व्यक्तीने हा विचार माझ्या मनात निर्माण केला तेव्हा मी लिहिले, ‘राम आएंगे,लीला राम की सुनाएंगे, राम आएंगे’ असा मुखडा लिहिला. ही मालिका दूरदर्शन या वाहिनीवर प्रसारित केली जाईल. पण रामाच्या भूमिकेसाठी योग्य राम शोधणे हे आमच्यासमोरील मोठे आव्हानच आहे”, असेही प्रेम सागर यांनी सांगितले.