हॉलिवूड मनोरंजन विश्वातून नुकतीच एक दु:खद बातमी समोर येत आहे. कॅप्टन मार्वल चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेला हॉलिवूड अभिनेता केनेथ मिशेल यांचे निधन झाले आहे. काल (२५ फेब्रुवारी) रोजी वयाच्या ४९व्या वर्षी त्यांनी या अखेरचा निरोप घेतला. अभिनेत्याला ॲमियोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस (ALS) हा आजार झाला होता. पण या आजाराशी अभिनेत्याची झुंज अपयशी ठरली असून केनेथने या जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी ही दु:खद बातमी त्याच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
केनेथ मिशेलच्या अधिकृत सोशल मीडियाद्वारे एक भलीमोठी पोस्ट शेअर करत ही दु:खद बातमी सांगण्यात आली आहे. या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “अतिशय जड अंत:करणाने आणि अतीव दुःखाने आम्ही तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की केनेथ अलेक्झांडर मिशेल हे आता आपल्यात राहिले नाहीत. केनला सुमारे साडेपाच वर्षांपासून एएलएसचा त्रास होता आणि या आजाराशी सुरु असलेला त्याचा लढा अखेर संपला आहे”.
‘स्टार ट्रेक: डिस्कव्हरी’ आणि ‘कॅप्टन मार्वल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या शानदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली होती. अभिनेत्याच्या निधनाच्या वृत्ताने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्याच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर कमेंट्स करत दुःख व्यक्त केलं आहे.
तसेच लाडक्या अभिनेत्याला श्रद्धांजलीदेखील वाहिली आहे. केनेथच्या अनेक प्रियजणांनी “तुला कधीही विसरता येणार नाही, तू नेहमीच प्रेरणा म्हणून स्मरणात राहशील” अशा प्रतिक्रिया व्यक्त करत त्याच्याबद्दल दु:ख व्यक्त आहे.