‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेला गायक म्हणजे प्रथमेश लघाटे. प्रथमेशने या रिऍलिटी शोमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. प्रथमेशच्या गायनाचे लाखो चाहते दिवाने आहेत. शास्त्रीय संगीतात प्रथमेश विशेष सक्रिय असलेला पाहायला मिळतो. अनेकदा तो गायनाचे कार्यक्रम घेत चाहत्यांची मनं जिंकतो. प्रथमेशने आजवर त्याच्या गायनसेवेने साऱ्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. प्रथमेशचा खूप मोठा चाहतावर्ग असून या चाहत्यांसाठी प्रथमेशने एक खास आभार पोस्ट शेअर केली आहे. (Prathmesh Laghate Fan Moment)
प्रथमेश गायनसेवेसाठी अनेकदा दौरे करताना दिसतो. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही त्याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अशातच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रथमेशने खास वर्धा येथे गायनसेवेसाठी हजेरी लावली होती. यावेळी सकाळी ५ वाजता नाव वर्षाच्या स्वागतासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान या कार्यक्रमाला प्रथमेशच्या अनेक चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला. कार्यक्रमादरम्यान वादळी वारा आणि गारांचा पाऊस असूनही चाहते मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

चाहत्यांनी या कार्यक्रमाला दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर प्रथमेशने खास पोस्ट शेअर केली आहे. कार्यक्रमाचा फोटो शेअर करत, “रात्री २ वाजता वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडूनही पहाटे ५च्या कार्यक्रमाला वर्धेकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. खूप खूप धन्यवाद वर्धेकर रसिक. सर्वांना गुढी पाडव्याच्या व हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. येणार हे नवीन वर्ष, क्रोधीनाम संवत्सर आपणास सुख, समाधान, मनःशांती, उत्तम आयुरारोग्य व भरभराटीच जावो”, असं म्हणत त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत. आणि सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रथमेश व त्याची पत्नी मुग्धा वैशंपायन बरेचदा एकत्र गायनसेवेचे कार्य करत असतात. दोघांच्या लग्नामुळे ही जोडी बरीच चर्चेत आलेली पाहायला मिळाली. सोशल मीडियावरही प्रथमेश व मुग्धा बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. कलाक्षेत्रातील ही जोडी चाहत्यांची आवडती जोडी आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.