हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या भूमिकेसाठी कठोर परिश्रम घेतेले आहेत. ‘दंगल’चा आमिर असो किंवा ‘दम लगाके हैशा’मधील भूमी पेडणेकर. यामध्ये आता एक नवीन अभिनेत्याचे नाव सामील झालेले पाहायला मिळत आहे. तो अभिनेता म्हणजे रणदीप हुड्डा. रणदीपचा नुकताच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचीदेखील खूप पसंती मिळाली आहे. या चित्रपटामध्ये त्याने स्वातंत्र्यवीर सावकरांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याने तब्बल २६ किलो वजन कमी केले होते. त्याबद्दल आता रणदीपने स्वतः भाष्य केले आहे. (randeep hudda on transformation)
गेल्या महिन्यात रणदीपचा स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये रणदीपने स्वतः मुख्य भूमिका साकारली असून त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने पहिल्यांदाच दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी त्याचा एक ट्रान्सफॉर्मेशनचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये त्याने आपले वजन खूप कमी केले असल्याचे दिसून आले होते. त्याचा व्हिडीओ व्हायरल होताच सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यानंतर त्याने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ट्रान्सफोर्मेशनबद्दल दिलखुलासपणे गप्पा मारल्या. तो म्हणाला की, “ही भूमिका माझ्यासाठी खूप जोखमीची होती. मी याआधी ‘सरबजीत’ या चित्रपटासाठी वजन कमी केले होते. पण ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’साठी वजन कमी करणे हे अधिक कठीण होते”.
पुढे तो म्हणाला की, “माझे वजन ९२ किलो होते. या चित्रपटासाठी मी ६० किलो वजन कमी केले. यासाठी मला प्रत्येक दिवसाला १ किलो वजन कमी करायचे होते. हे माझ्यासाठी खूप कठीण होते. मी खूप कमकुवत झालो होतो. अनेकदा यामुळे मी कधी कधी बेशुद्धदेखील पडायचो”.
तसेच त्याने सांगितले की, “हे एखाद्या कलाकारांसाठी खूप कठीण असते जेव्हा त्याला एखाद्या भूमिकेसाठी खाण्यापिण्यापासून लांब राहावे लागते. मी या चित्रपटासाठी स्वतःलाच विसरून गेलो होतो. या सर्व प्रक्रियेमध्ये माझा मृत्यू होईल असेदेखील मला वाटायचे. पण माझ्या मेहनतीचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. मी सोशल मीडियावर फोटो अपलोड करताच त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला होता. हा फोटो पाहून चाहत्यांनी माझी तुलना हॉलिवूड क्रिश्चीयन बॅल बरोबर केली होती”.
दरम्यान रणदीपच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळाला. आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.