सोशल मीडियावर सध्या ट्रेंडिंग रीलची चलती असलेली पाहायला मिळत आहे. बरेचदा कोकणातील निसर्गाचे दर्शन देणारे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. अशातच गोव्यातील एका प्रसिद्ध ठिकाणाचा एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. गोव्यातील नेत्रावली या गावातील बुडबुड्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणचा हा व्हिडीओ आहे. एखाद्या विशिष्ट आवाजाला प्रतिसाद देत तलावातून वर येणारे हे बुडबुडे लक्षवेधी ठरले असून सर्वत्र या ठिकाणाची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया ब्लॉगर संकेत शिंदे याने हा व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. (Bubling Lake Video)
नेत्रावली या शांत व प्रसन्न गावात वसलेले हे तलाव बुडबुड्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे बुडबुडे सरोवरात विशिष्ट आवाजांना प्रतिसाद देतात आणि तुम्ही टाळ्या वाजवल्यास ते अधिक वेगाने वर येतात. हे तलाव एक सुंदर नैसर्गिक चमत्कार आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. या प्रसिद्ध ठिकाणाला भेट देण्यासाठी अनेक लोक लांबून येत असतात. या बुडबुड्यांच्या तलावाचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे तलावाशेजारी असणारे गोपीनाथ मंदिर.
या तलावातील बुडबुड्यांच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण वैविध्यपूर्ण आहे. काही लोक असा दावा करतात की, हे स्थानिक देवतेचे कार्य आहे. तर काहींचे असे म्हणणे आहे की, हे बुडबुडे कार्बन किंवा सल्फर डायऑक्साइड वायूमुळे तयार होतात. सरोवरात भरपूर मासे असल्यामुळे मिथेनचे श्रेय दिलेला सिद्धांत खोटा ठरला आहे. मात्र या तलावातील बुडबुड्यांचे खरे मूळ अद्याप एक रहस्य आहे.
या तलावाची आणखी एक विलोभनीय बाब म्हणजे तलावाजवळ टाळ्या वाजवल्यास बुडबुडे वेगवान वर येतात. बुडबुडे तयार होण्याशी ध्वनीशास्त्राचा काहीतरी संबंध आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. अद्याप यामागचे कोणतेही वैज्ञानिक स्पष्टीकरण समोर आलेले नाही. दक्षिण गोव्यातील संगुम तालुक्यात नेत्रावली हे गाव वसले आहे. बुडबुड्याची तळी हे गाव पणजी शहारापासून ८० किमी आणि मडगावपासून ५० किमी अंतरावर आहे. नेत्रावली तलावाला अनेक नावांनी ओळखले जाते. जसे की बुडबुड, बुडबुड्याची तळी वा बबल तलाव.