आजवर झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. जवळपास दहा वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत होता. या कार्यक्रमाची रूपरेषा डॉ. निलेश साबळे याने सांभाळली. प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता या कार्यक्रमाने निरोप घेतला. त्यामुळे “मंडळी हसताय ना, हसायलाच पाहिजे”, हा निलेश साबळेंचा आवाज सारेच प्रेक्षक मिस करत होते. प्रेक्षकांना आता हा आवाज पुन्हा ऐकायला मिळणार आहे, याची नोंद निलेश साबळेंनी घेतली आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. (Dr. Nilesh Sable New Show)
डॉ. निलेश साबळे यांच्या नव्या कार्यक्रमाची घोषणा झाली असून हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या लाडक्या कलर्स मराठी वाहिनीवर येण्यास सज्ज होत आहे. कलर्स मराठी नव्या वर्षात नवी उर्जा आणि नवी झळाळी घेऊन आपल्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा धमाकेदार खजिना घेऊन येत आहे. ‘इंद्रायणी’, ‘सुख कळले’ या मालिकांनंतर कलर्स मराठी आता विनोदाचा ॲटमबॅाम्ब फोडायला सज्ज झाली आहे. महाराष्ट्राचा अत्यंत लाडका विनोदाचा बादशाह अर्थात डॅा. निलेश साबळे याच्याबरोबर विनोदाची ही सुपरफास्ट मेल आता कलर्स मराठी घेऊन येत आहे.
डॉ. निलेश साबळेबरोबरच भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे विनोदसम्राट या कार्यक्रमात सहभागी असणार असून या कार्यक्रमाचे नाव “हसताय ना ?हसायलाच पाहिजे!!”, असे ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी तिहेरी धुरा डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळणार असून यात भाऊ कदम, ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम , स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण आदि कलाकार त्यांना साथ देणार आहेत. तर या कार्यक्रमात महाराष्ट्राचे कॅामेडी किंग आणि अत्यंत संवेदनशील गुणी अभिनेते भरत जाधव आणि चार दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या अलका कुबल आठल्ये हे दोन महान कलाकार दर भागामधे सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी लाभणार आहेत. त्यामुळे विनोदाचा हा पॅावरबाज डोस घेण्यासाठी सज्ज रहा.
डॉ. निलेश साबळे यांनी आपल्या बहारदार विनोदाने अवघ्या महाराष्ट्राला हसवले. केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात त्यांनी त्यांचे चाहते निर्माण केले. भाऊ कदम यांनीही आपल्या मिश्किल चेहऱ्याने आणि निखळ विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे केले. तसेच ओंकार भोजनेही आपल्या खास शैलीमुळे प्रेक्षकांचा लाडका झाला. आता विनोदाचे हे तीन हुकमी एक्के एकत्र येऊन पुन्हा एकदा नव्या जोशात , नव्या जल्लोषात विनोदाची चौफेर आतषबाजी करायला सज्ज झाले आहेत. ”हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!’ हा शो कलर्स मराठीवर २० एप्रिलपासून शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता पाहायला मिळणार आहे.