एखादी नवीन मालिका सुरु झाली की तिला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळतो. मालिकेतील नव्या कथानकामुळे काही काळ ती मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करते. कथानक मनोरंजक असेल तर प्रेक्षक त्या मालिकेचा बराच काळ आस्वाद घेतात. मात्र कालांतराने टीआरपीमुळे निर्मात्यांकडून मालिकेच्या कथानकात बदल केले जातात. मालिकेच्या दृष्टीने हे बदल गरजेचे असले, तरी प्रेक्षक या बदलांमुळे काहीवेळेस नाराज असतात. त्यामुळे या नवीन बदलांमुळे नाराज होऊन प्रेक्षकांकडून मालिका बंद करण्याची मागणी केली जाते.
छोट्या पडद्यावरील अशीच एक लोकप्रिय मालिका म्हणजे झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका. या मालिकेला प्रेक्षकांनी आजवर चांगलाच प्रतिसाद दिला आहे. नुकतेच या मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाले आणि याचनिमित्ताने सेटवर खास जंगी सलिब्रेशनही करण्यात आले. मात्र आता या मालिकेतील नवीन ट्विस्टमुळे ही मालिका बंद करण्यात यावी अशी प्रेक्षक प्रतिक्रिया येत आहे. यावर आता मालिकेतील एका मुख्य अभिनेत्रीने तिची प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्री ऐश्वर्या नारकार यांनी मालिकेच्या ५०० भागानिमित्त ‘इट्स मज्जा’बरोबर संवाद साधला. यावेळी ऐश्वर्या यांना विरोचकाचा शेवट कधी होणार असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत त्यांनी असं म्हटलं की, “विरोचकाचा शेवट आणि मालिकेचा शेवट हा एकाच दिवशी होणार. विरोचक गेल्यानंतर मालिकेला अर्थ राहणार नाही. त्रिनयना व विरोचक यांच्यातील युद्ध हाच या मालिकेचा उद्देश आहे. त्यामुळे विरोचक संपेल तेव्हा मालिका संपेल.”
दरम्यान, नुकताच या मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला होता. यात नेत्रा-अद्वैत यांचा रोमान्स दाखवण्यात आला होता. तसेच या व्हिडिओद्वारे नेत्राला रुपालीचं सत्य समजलं आहे की काय? असाही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामुळे मालिकेला आता पुढे काय पहायला मिळणार? याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.