Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate : सिनेसृष्टीत सध्या बरीच लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार जोड्या या विवाहबंधनात अडकत आहेत. गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर, सुरुची अडारकर-पियुष रानडे, स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी या कलाकार जोड्यांसह गायिका मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेनेही लग्नगाठ बांधली. मुग्धा व प्रथमेश यांचं लग्न विशेष चर्चेत राहिलं. कारण मुग्धा व प्रथमेशच्या लग्नातील साधेपणाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
मुग्धा-प्रथमेश यांनी २१ डिसेंबर २०२३ रोजी छोटेखानी विवाहसोहळा उरकला. अत्यंत साधेपणाने सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींच्या तसेच जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत ही जोडी चिपळूण येथे विवाहबंधनात अडकली. दोघांच्या लग्नातील पारंपरिक अंदाज प्रेक्षकांना विशेष भावला. शिवाय प्रथमेश-मुग्धा यांचे लग्नापूर्वीचे विधीही अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात आले. दोघेही त्यांच्या लग्नसोहळ्यातील खास क्षण सोशल मीडियावरून शेअर करत आहेत.
अशातच मुग्धाने तिच्या सासरच्या घरी गृहप्रवेश करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. मुग्धा-प्रथमेशच्या या व्हिडीओवर चाहत्यांसह नेटकऱ्यांनीही कमेंट केल्या आहेत. मुग्धा व प्रथमेश त्यांचे लग्नानंतरचे दिवस एन्जॉय करताना दिसत आहेत. अशातच अभिनेत्रीने शेअर केलेल्या गृहप्रवेशच्या व्हिडीओमधील स्पेशल उखाण्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. फुलांच्या पायघड्या, दोघांचं औक्षण करत त्यांनी खास उखाणा घेत गृहप्रवेश केला.
यावेळी प्रथमेशने घेतलेल्या मजेशीर उखाण्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. “कपात ओतला चहा चहाखाली ठेवली बशी, मुग्धा माझी गरीब गाय, बाकी सगळ्या मारक्या म्हशी” असा गमतीशीर उखाणा त्याने घेतला. तर मुग्धाने “मंगळसूत्राच्या दोन वाट्या, म्हणजे माहेरची व सासरची खून, प्रथमेशच नाव घेऊन कलाश्रीमध्ये गृहप्रवेश करते, नीना आणि उमेश लघाटे यांची सून” हा उखाणा घेत लघाटेंच्या घरी गृहप्रवेश केला. यानंतर दोघांनी त्यांच्या घरच्या देवाचे दर्शन घेतले.