झी गौरव पुरस्कार हा मराठी पुरस्कार सोहळ्यांपैकी एक मानाचा पुरस्कार मानला जातो. मराठी मनोरंजन सृष्टीत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या कलाकारांच्या कौतुकास्पद कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कार सोहळ्याचे ‘झी चित्र गौरव’ व ‘झी नाट्य गौरव’ अशा दोन स्वरुपांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. चित्रपट सृष्टीसंबंधित पुरस्कार ‘चित्र गौरव’ म्हणून दिले जातात, तर नाटकात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना ‘नाट्य गौरव’ पुरस्कार देऊन सन्मान केला जातो.
अशातच काल (६ मार्च) रोजी ‘झी नाट्य गौरव पुरस्कार’ सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री अमृता देशमुखला व्यावसायिक नाटकात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर हा पुरस्कार मिळाल्यानिमित्त आनंद व्यक्त केला आहे. मात्र तिच्यापेक्षाही अमृताच्या नवऱ्याला म्हणजेच अभिनेता प्रसाद जवादेला जास्तच आनंद झाला आहे.
अमृताला ‘झी नाट्य गौरव’चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळताच प्रसादचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. यानिमित्ताने प्रसादने एक खास व्हिडीओ शेअर करत लाडक्या बायकोचे अभिनंदन केले आहे. प्रसादने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट करत असं म्हटलं आहे की, “झी नाट्य गौरव २०२४ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अमृता देशमुख. मी म्हटल्याप्रमाणे मी वाट पाहत आहे. अभिनंदन बायको, माझं तुझ्यावर प्रेम आहे.”
दरम्यान, अमृता देशमुखचे सध्या नियम व अटी लागू हे नाटक रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. या नाटकात तिच्याबरोबर अभिनेता संकर्षण कऱ्हाडेही प्रमुख भूमिकेत आहे. या नाटकाचे प्रत्येक दौरे यशस्वी होत असून तिकीट बारीवर या नाटकाचे हाउसफुलचे बोर्ड झळकत आहेत. अशातच आता अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे.