मराठी मनोरंजन विश्वातील सध्याच्या काही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. छोट्या पडद्यावरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेद्वारे तिने जोडलेली रेशीमगाठ अजूनही कायम आहे. प्राजक्ताने मराठी मालिका, चित्रपट यांसह अनेक कार्यक्रमांद्वारे सूत्रसंचालन करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आपल्या अभिनय व उत्तम सूत्रसंचालनाद्वारे चर्चेत असणारी अहिनेत्री तिच्या सोशल मीडियाद्वारे ही तितकीच चर्चेत असते.
अभिनेत्री अनेकदा तिचे लेटेस्ट फोटोशूट, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील फोटो, आगामी प्रोजेक्ट, तसेच तिच्या ‘प्राजक्तराज’ व ‘प्राजक्तकुंज’संबंधित काही ना काही पोस्ट शेअर करत असते. अशातच तिने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. अभिनेत्रीने एका खास फोटोशूटच्या कॅमेऱ्यामागची गंमत चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
प्राजक्ताने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिच्या काही फोटोशूटचे bts म्हणजेच कॅमेऱ्यामागचे क्षण पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर तिने काही जाहिरातींसाठी केलेल्या फोटोशूटची खास झलकही पाहायला मिळत आहे. या संपूर्ण व्हिडीओमध्ये प्राजक्ताचा मजेशीर व गंमतीशीर अंदाजही पाहायला मिळत आहे. या व्हिडीओच्या खाली लिहिलेल्या कॅप्शनमुळे तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
या व्हिडीओखाली तिने “कर्ज फेडायला करावं लागत बाबा.’ असं गंमतीत म्हटलं आहे. या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाचप्रतिसाद दिला आहे. “किती सुंदर, छान, एकदम भारी दिसत आहेस, तू साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहेस” अशा अनेक कमेंट्स करत तिचे कौतुक केले आहे. दरम्यान, प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोद्वारे सूत्रसंचालन करत आहे. या शोमधील कलाकारांच्या विनोदी अभिनयासह तिच्या सूत्रसंचालनाचेदेखील अनेक चाहते आहेत.