अभिनेता सलमान खान सध्या चर्चेत आला आहे. सलमान खानच्या घरावर रविवारी पहाटे गोळीबार करण्यात आला. पहाटे ५ वाजताच्या सुमारास त्यांनी गोळ्या झाडल्या. हे दोघेही हल्लेखोर दुचाकीवरुन अभिनेत्याच्या घरापर्यंत आले होते. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरु होता. आता याप्रकरणी गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दोन आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आलं असल्याचं समोर आलं आहे. या आरोपींची ओळख पटवण्यात आली असून यासंदर्भात पोलिसांनी व्हिडीओही शेअर केला आहे. (Rakhi Sawant On Salman Khan)
या व्हिडीओनंतर आता अनेक कलाकार मंडळींनी सलमान खानच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केली आहे. सलमान खान याच्याबरोबर जे काही घडलं ते अत्यंत चुकीचं आहे असं म्हणत काहींनी पोस्ट शेअर केल्या आहेत. अशातच अभिनेत्री राखी सावंत हिने सलमानच्या समर्थनार्थ शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. राखीला आजवर सलमान खानने बरीच मदत केली आहे. राखीच्या आईच्या आजारपणावेळीही सलमान त्यांच्या मदतीला धावून आला होता. आज सलमानच्या जीवावर काहीजण उठताच राखीने विनंती करणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
राखीने हा व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “तुम्हाला कोणाचा जीव घ्यायचा असेल तर माझा जीव घ्या. मी एक सर्वसामान्य मनुष्य आहे. आणि तुम्हा सर्वांची बहीण आहे. अगदी हात जोडून मी तुम्हाला विनंती करते की, तुम्ही सलमान खानबरोबर असं चुकीचं करु नका. सलमान भाऊ माझ्यासाठी देवता आहेत. माझी आई मृत्यूशी झुंज देत होती तेव्हा त्यांनी पैशांची मदत करत ऑपरेशन करुन घेतलं. करोना काळात मला आर्थिक मदत हवी होती तेव्हाही त्यांनी मला कसलाही विचार न करता पैशांची मदत केली. याहून चांगला माणूस शोधून सापडणार नाही”.
पुढे राखी म्हणाली, “मी आवाज चढवून नाही तर नम्रतेने हात जोडून विनंती करते की असं करु नका. तुम्ही मला माझ्या भावासारखे आहात. मी हिंदू कुटुंबातील मुलगी आहे. काय खरं, काय खोटं हे मला माहित नाही, पण तरी मी हात जोडून तुम्हाला विनंती करेन की, सलमान खान यांच्या विरोधात काही चुकीचं करु नका”.