मराठी सिनेसृष्टीत कलाकार मंडळी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली देताना दिसत आहेत. प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पूजा सावंत हिने नुकतीच तिच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. काही दिवसांपूर्वी तिच्या होणाऱ्या पतीबरोबरचे पाठमोरे फोटो शेअर करत रिंग फ्लॉन्ट केली. तेव्हापासून अनेकांनी अंदाज बांधायला सुरुवात केली. मात्र या चर्चांना अभिनेत्रीने पूर्णविराम देत तिच्या पतीबरोबरचे फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. (Pooja Sawant Boyfriend)
सिद्धेश चव्हाण असे अभिनेत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव आहे. पूजाने सिद्धेशबरोबर रोमँटिक पोज देत फोटो शेअर केले. पूजा व सिद्धेश यांचं अरेंज मॅरेज सेटअपमध्ये लग्न ठरलं आहे. पूजाचा होणार नवरा हा मूळचा मुंबईचा आहे. सिद्धेश चव्हाण अभिनेता किंवा इंडस्ट्रीतील व्यक्ती नसून तो ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी करत आहे. पूजाने तिच्या या मिस्ट्री मॅनची झलक तिच्या सोशल मीडियावरून दाखवली. अभिनेत्रीने नुकतीच रेडिओ सिटी मराठी या रेडिओ चॅनलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना अभिनेत्रीने तिने शेअर केलेल्या पाठमोऱ्या फोटोंमागील गुपित उलगडलं.
याबाबत बोलताना अभिनेत्री म्हणाली, “मी पाठमोरा फोटो शेअर केल्यावर सगळेजण वेगवेगळा अंदाज बांधणार याची मला चांगलीच कल्पना होती. काही लोकांना तो भूषण किंवा वैभव वाटणार याचीही मला खात्री होती. पण, अनेकांना साइड फेसने सिद्धेश आदिनाथसारखा वाटला. मी हा निर्णय अगदी विचारपूर्वक घेतला होता. माझ्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरू आहे याची कोणालाच माहिती नव्हती. त्यामुळे सगळ्यात आधी पाठमोरे टाकायचे हे आधीच ठरवलं होतं. योग्य व्यक्ती आयुष्यात आल्यावर सगळ्या गोष्टी बदलतात. जे आपल्या नशिबात असतं ते सगळं आपल्याला मिळतं” असं ती म्हणाली.
काही दिवसांपूर्वी सिद्धेशने पूजाला प्रपोज केला असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. वर्षाअखेरीस पूजाने एक सुंदर व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये सिद्धेश तिला गुडघ्यावर बसून लग्नाची मागणी घालताना दिसला. सिद्धेशने गुडघ्यावर बसून पूजाला अंगठी घालत तिला प्रपोज केलं.