महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. हिवाळी अधिवेशनात सुरक्षेच्या प्रश्नावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं अशी मागणी करुन सभागृहात गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या ४९ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. लोकसभेतील ४९ खासदारांना काल निलंबित करण्यात आले. केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव लोकसभेत मांडला आणि तो मंजूर झाला. त्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळत आहे. (Tejaswini Pandit On Loksabha)
निलंबित झालेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचा समावेश आहे. या प्रकरणावरून आता विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असल्याचं समोर आलं आहे. एका मराठमोळ्या अभिनेत्रीनेही सोशल मीडिया पोस्ट शेअर करत या प्रकरणावरून भाष्य केलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. तेजस्विनीने सोशल मीडियावर इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत सुप्रिया सुळे यांचा प्रतिक्रिया देतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
तेजस्विनीने सुप्रिया सुळे यांचा हा व्हिडीओ शेअर करत, त्यावर “चला बिलं पास करुन घ्या पटापट, मेजॉरिटी तर आधीपासून होतीच आता तर विरोध करायला कुणी नाही. लोकशाही बसली धाब्यावर! हुकूमशाहीचा उदय की अंताकडे प्रवास?” असं कॅप्शन देत प्रश्न उपस्थित केला आहे. तेजस्विनी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. काही ना काही खास गोष्टी शेअर करत ती चर्चेतही असते.
तेजस्विनी विशेषतः सामाजिक व राजकीय मुद्द्यांवर स्पष्टपणे भाष्य करताना दिसते. खासदारांच्या निलंबनावरून प्रश्न उपस्थित करत तेजस्विनीने केलेली ही पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. आजवर तेजस्विनीने मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटातही ती मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली.