सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकार मंडळींची लग्न ही चर्चेत राहिली. अशातच काही दिवसांपूर्वी एक कलाकार जोडी लग्नबंधनात अडकली ती म्हणजे पियुष रानडे व सुरुची अडारकर. गुपचूप लग्न सोहळा उरकत या जोडीने चाहत्यांना खूप मोठा आश्चर्याचा धक्का दिला. दोघांनीही त्यांच्या लग्नसोहळ्यातील खास क्षण त्यांच्या सोशल मीडियावरून शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. अचानक समोर आलेल्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. (Suruchi Adarkar Piyush Ranade Wedding)
सुरुची व पियुषच्या लग्नाच्या बातमीनंतर अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला तर अनेकांनी त्यांना ट्रोलही केलं. दरम्यान सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकार मंडळींनी सुरुची-पियुषच्या लग्नाला हजेरी लावली होती. कलाकारांनीही सुरुची व पियुषला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पियुषची मानलेली बहीण श्रेया बुगडे हिने देखील भावाच्या लग्नात धमाल केलेली पाहायला मिळाली. श्रेयानेही पियुष-सुरुचीच्या लग्नात मज्जा मस्ती केली. सुरुची-पियुषच्या लग्नाच्या तयारीत श्रेया बुगडेचा खारीचा वाटा आहे. नुकत्याच ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत दोघांनी भाष्य केलं आहे. ‘इट्स मज्जा’ने सुरुची व पियुष यांचं केळवण स्पेशल अशी मुलाखत घेतली. यावेळी बोलताना दोघांनी त्यांच्या लग्नाबद्दल तसेच त्यांच्या नात्याबद्दलच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला.
लग्नाची तयारी कोणी केली असा प्रश्न दोघांनाही विचारण्यात आला. यावेळी पियुष म्हणाला, “ही संपूर्ण कल्पना सुरुचीची होती. माझं असं मत होतं की, आपण ज्यांना ओळखतो किंवा जे आपल्याला ओळखतात त्यांना लग्नाला बोलावलं पाहिजे. म्हणजे कुटुंबिय, मोजकेच जवळचे मित्र-मंडळी. रजिस्टर पद्धतीने किंवा विधीनुसार लग्न करण्यास मी तयार होतो. पण तिची छान लग्न करण्याची इच्छा होती. लग्नाची तयारी सुरु झाल्यानंतर मलाही सगळं छान वाटायला लागलं. पण आम्हाला हे सगळं गुपित ठेवायचं होतं. बाकी सगळं काम नव्या नवरीनेच केलं. ती काम पण करत होती आणि सगळीकडे बघतही होती”.
तुमच्या लग्नाबाबत कोणालाही कळालं नाही तसेच हे गुपित ठेवणं फार कठिण असतं असंही सुरुची-पियुषला विचारण्यात आलं. यावेळी सुरुची म्हणाली, “याचं संपूर्ण श्रेय आमच्या सगळ्या जवळच्या माणसांना जातं. आमच्या जवळची खूप कमी माणसं आहेत. कारण तोही खूप सोशल नाही आणि मीही नाही. आमचे बोटावर मोजण्याइतकेच मित्र-मैत्रिणी आहेत. पण आम्ही त्या सगळ्यांना सांगितल्यानंतर प्रत्येक गोष्टीचं गांभीर्य कळालं. सुरुची लग्नाच्या तयारीबाबत म्हणाली, मी देवगडला चित्रीकरण करत होते तर पियुषचं इकडेच चित्रीकरण सुरु होतं. पियुषला माहित होतं की, मी लग्नाचं सगळं बघत आहे. त्यामुळे तो फक्त माझ्याबरोबर होता. पण सगळं काम मी करत होते. त्यादरम्यान मी श्रेया बुगडेला फोन केला. तिला काय काय काम आहे ते सांगितलं. तेव्हा तिने मला तू काही काळजी करु नको आपण करु असं म्हटलं. त्यानंतर श्रेयाने दुसऱ्याच दिवशी निधीचा (विचित्र मीडिया) नंबर दिला. त्यानंतर बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या. तिने सगळं काही केलं”.