पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील काही पीडित कुटुंबांनी त्यांच्या घरातील कर्त्या पुरुषांनाच गमावलं. अत्यंत जवळच्या व्यक्तींना गमावल्याचं दुःख आणि कुटुंबियांची परिस्थिती थरकाप उडवणारी आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश होता. यापैकी डोंबिवलीचे तीन जण होते. अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला. दुर्देव म्हणजे हे तिघेही मावस भावंडं होते. या तिन्ही कुटुंबातील व्यक्तींच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार झाल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. तेव्हा त्यांनी सत्य घटना सविस्तर सांगितली. त्यांनी सांगितलेला प्रत्येक क्षण अंगावर काटा आणणारा होता. (Maharashtra tourist killed in pahalgam terror attack)
माझ्या हाताला काहीतरी लागलं आणि…
मृत पावलेल्या संजय लेलेंचा मुलगा हर्षल लेलेने संपूर्ण घटना सांगितली. लेकाला डोळ्यासमोर वडिलांचा मृतदेह पाहावा लागला. हर्षल म्हणाला, “पहलगाममध्ये जेव्हा गोळीबार सुरु होता तेव्हा माझा हात माझ्या वडिलांच्या डोक्यावर होता. माझ्या हाताला जाणवलं की, काहीतरी हातावर पडलं आहे. मला आधी वाटलं की, हाताला गोळी लागली आहे. पण जेव्हा मी उठून बघितलं तेव्हा बाबांचं डोकं रक्ताने माखलं होतं. तिथल्या स्थायिकांनी आम्हाला सांगितलं की, तुम्हाला तुमचा जीव वाचवायचा असेल तर इथून निघून जा. या लोकांना वाचवण्यासाठी सैनिक येतील”.
त्याने आईला पाठिवर उचलून घेतलं
“ते ठिकाणच असं आहे की, तिथे फक्त घोडेच जातात. मग तिथल्या स्थायिकांनी एक एक करुन अनेकांना घोड्याने पाठवत होते. तर काही चालत खाली उतरत निघाले. माझ्या आईला अर्धांगवायू आहे. तर मी व माझ्या भावाने तिला धरुन खाली आणलं. आमचा जो घोडावाला होता तो नशिबाने आमच्या इथे आला. त्याने आईला पाठीवर उचलून घेत खाली नेलं. तेथील शासनाचे अधिकारी जे बोलणं करत होते त्यावरुन आम्हाला हेही कळालं की, चार वर्षाच्या मुलालाही गोळी मारण्यात आली आहे”.
मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी…
पुढे हर्षल म्हणाला, “दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास दहशतवाद्यांनी गोळीबार केला. पहलगामच्या त्या ठिकाणावरुन खाली उतरुन आम्ही ६ वाजताच्या दरम्यान पोहोचलो. तेव्हा आम्हाला कसलीच माहिती मिळाली नव्हती. ७.३० दरम्यान आम्हाला कळालं की, तिघांचा मृत्यू झाला आहे. सकाळी ७ वाजता आम्हाला मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी यावं लागेल असं सांगण्यात आलं. मी ओळख पटवण्यासाठी गेलो. तिथून परतल्यानंतर ही बातमी मी सगळ्यांना सांगितली”. हर्षलने स्वतःला सावरत हा संपूर्ण प्रकार सांगितला.