‘पारू’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. मालिकेत येणाऱ्या रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना पाहायला मिळत आहे. मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे व अभिनेता प्रसाद जवादे यांची मुख्य भूमिका पाहायला मिळत आहे. पारू व आदित्यभोवती मालिकेचं कथानक फिरताना दिसत आहे. दरम्यान मालिकेला टीआरपीदेखील चांगला मिळत आहे. ‘पारू’ मालिका गेल्या आठवड्यात टीआरपी यादीत १५व्या स्थानावर आहे. (Paaru serial Troll)
मालिकेचा टीआरपी रेट वाढत असतानाच आता मालिकेत आलेल्या रंजक वळणावर आता प्रेक्षक मालिकेवर भडकलेले पाहायला मिळत आहेत. काही महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या या मालिकेवर बंदी आणण्याबाबत प्रेक्षकांनी आवाज उठवला. मालिका बंद करण्याची मागणी नेटकऱ्यांकडून केली जात आहे. मालिकेच्या प्रोमोमधील एका सीनवर प्रेक्षक भडकले आहेत. झी मराठी वाहिनीच्या ऑफिशिअल पेजवरुन नुकताच एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
मालिकेच्या या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, अहिल्यादेवी घरात नसताना दामिनीने त्यांची जागा घेतली आहे. अहिल्यादेवी बनून ती घरात वावर करत असते आणि तिच्याबरोबर दिशासुद्धा असते. दामिनीचा हा अवतार पाहून साऱ्यांनाच अचंबित केलं आहे. दामिनी अहिल्यादेवींच्या अवतारात असताना ती गनीला त्याच्या पाठीवर खूप फटके मारत असते आणि त्याला विचारत असते की, पारू आदित्यला कुठे घेऊन गेली आहे ते आम्हाला सांग. सतत पट्टीने मारत असल्याने गनी खूप रडत असतो. आणि तो बोलतो पारू कुठे गेली आहे हे मला माहीत नाही.


दामिनी गनीला मारहाण करत आहे हे पाहून नेटकरी भडकले आहेत. नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट करत, “पारू’ मालिकेचे नाव बदलून ‘फालतुगिरी’ ठेवा जास्त शोभेल”, “त्या दिशाचं पात्र संपवा नाहीतर मालिकाच बंद करा”, “लहान मुलांना असं मारताना बघवत नाही. यांना अभिनय कसा करवतो? दुसरी वेळ आहे ही लहान मुलांना मारताना दाखविण्याची. अहिल्याचा पोषाख घालून मारते आहे ही”, “खूप चुकीचं दाखवलं आहे. बाल हिंसाचार. लाज वाटली पाहिजे लेखकाला. इतक्या हीन पातळीवर का? तर टीआरपीसाठी?”, “बाल अत्याचाराला खतपणी. मालिका बंद करा”, अशा अनेक कमेंट करत राग व्यक्त केला आहे.