‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहे. मालिकेत सध्या खूप मोठं वादळ आलेलं पाहायला मिळत आहे. ऍड शुटचं सत्य अखेर अहिल्यादेवींसमोर आल्याने साऱ्यांना धक्का बसला आहे. अहिल्यादेवी स्वतः या धक्क्यातून सावरलेल्या नाही आहेत. अहिल्यादेवींसमोर हे सत्य आल्यानंतर त्यांनी आदित्यला खूप मोठी शिक्षा दिली आहे. आदित्यला ही सत्य या पद्धतीने आईसमोर आल्याने खूप वाईट वाटतं. (Paaru Serial Promo)
याचबरोबर अहिल्यादेवी आदित्यला आई म्हणून मला हाक मारायची नाही अशी सक्त ताकीद देतात. हे ऐकल्यावर आदित्य पूर्णतः कोलमडतो. शिवाय त्याला आईचा चेहराही पाहायला मिळत नाही म्हणून त्याची दमछाक होत असते. अहिल्यादेवींचा राग पाहून आदित्य पारूला मध्यस्थीही करायला सांगतो. मात्र अहिल्यादेवी पारूचंही काही म्हणणं ऐकून घेत नाहीत.
त्यानंतर हे वातावरण शांत होण्यासाठी पारू केळवणाचा घाट घालते. अहिल्यादेवी जेवल्या पाहिजेत या एकाच हेतूने पारू सर्व सोय करते. मात्र हे होऊ शकत नाही असं म्हणत अहिल्यादेवी पारूचा शब्द फेटाळून लावतात. एकूणच सर्व वातावरण पाहून आणि अहिल्यादेवींची वागणूक पाहून आदित्यला राग अनावर होतो. सहन न झाल्याने आदित्य थेट कामावर निघून जातो. अशातच मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. मालिकेच्या समोर आलेल्या या प्रोमोमध्ये आदित्य गाडी घेऊन बंगल्याबाहेर येतो. आणि गाडीतून उतरताना दारूची बाटली घेऊन उतरतो आणि जोरजोरात ओरडू लागतो.
तेव्हा दिशा धावतधावत अहिल्यादेवींच्या रूममध्ये येते आणि सांगते की, आपल्या बंगल्याबाहेर कोणीतरी दारुडा माणूस आला आहे आणि तो जोरजोरात ओरडत आहे. यावर अहिल्यादेवींनाही शॉक बसतो. तर आदित्य ओरडत असताना पारू तिथे येते आणि आदित्यचं बोलणं ऐकून ती त्याच तोंड बंद करते. आता आदित्यची ही वागणूक पाहून पारू ती परिस्थिती सांभाळेल का?, अहिल्यादेवींसमोर आदित्य दारू प्यायला असल्याचं सत्य येणार का?, हे येणाऱ्या भागात पाहणं रंजक ठरणार आहे.