Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, आदित्यचा वाढदिवस असतो, त्यामुळे किर्लोस्कर मेन्शनमध्ये खूप आनंदाचं वातावरण पसरलेलं असतं. पारू आदित्यला उठवायला येते तेव्हा आदित्य आधीच डोळ्यांना पट्टी बांधून खोलीमध्ये वावरताना दिसतो. त्यावेळेला पारू त्याला सावरते आणि विचारते की, तुम्ही डोळ्याला का पट्टी बांधली आहे?, तेव्हा पारुला आदित्य सांगतो की, माझ्या वाढदिवशी मी आईचा चेहरा पाहिल्याशिवाय माझा दिवस सुरु होत नाही. त्यामुळे आज मी जरा लवकर उठलो आणि आई यायला उशीर झालाय म्हणून मी डोळ्याला पट्टी बांधली आहे. तु मला माझ्या आई पर्यंत घेऊन जाशील का?, यावर पारू होकार देते. आदित्यच्या वाढदिवसानिमित्त तो खूप खुश असल्याने त्याला खुश पाहून तिलाही आनंद होतो.
डोळ्याला पट्टी बांधलेली असताना ती आदित्यला खरं सांगायचं म्हणून सांगते की, सर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, असं म्हणून ती गळ्यातलं मंगळसूत्र बाहेर काढते. मात्र आदित्यच्या डोळ्याला पट्टी असल्याने तो ते पाहू शकत नाही. आदित्यला सांगायला जाणार इतक्यात आदित्य काहीतरी बोलतो आणि ती विसरुन जाते त्याच वेळेला ती आदित्यच्या पाया पडते. पारू माझ्या पाया पडली का असा प्रश्न आदित्य पारूला विचारतो. यावर पारू सांगते की, तुमचा आज वाढदिवस आहे ना म्हणून मी तुमच्या पाया पडले. आज तुमचा दिवस आहे. यावर आदित्य सांगतो की, मला मग काहीतरी भेटवस्तू दे. पारू सांगते माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं असं काहीच नाहीये. त्यानंतर तो स्वतःच पारूच्या हातातील अंगठी काढून घेतो आणि स्वतःच्या बोटात घालतो आणि सांगतो की हेच तुझ्याकडून माझ्यासाठी असलेलं खास गिफ्ट आहे. आता मी अंगठी माझ्याकडे आयुष्यभर ठेवीन, हे ऐकून पारूलाही खूप आनंद होतो. त्यानंतर पारू आदित्यला घेऊन अहिल्यादेवींच्या रूममध्ये जाते.
तिकडे अहिल्यादेवी सांगतात की, अरे मी विसरले होते तू आज माझा चेहरा पाहिल्याशिवाय तुझा दिवस सुरु करणार नाहीस, असं म्हणून त्या आरशासमोर उभ्या राहतात. आणि पारू आदित्यच्या डोळ्यावरची पट्टी सोडते. एकाच आरशाच्या फ्रेम मध्ये पारू आदित्य आणि अहिल्यादेवी उभे असतात. आदित्य दोघींनाही एकत्र पहिल्यांदा पाहतो. त्यानंतर अहिल्या देवी आदित्य साठी खास वाढदिवसासाठी कपडे घेऊन आलेल्या असतात ते भेट म्हणून देतात. आदित्य तयार होऊन खाली येतो तेव्हा सगळेचजण त्याचं कौतुक करतात. तर पारुला दामिनीने गार्डन मधली फुलं काढायच्या कामाला लावलेलं असतं आणि फुलांची उधळण अनुष्का आली की तिच्यावर करायचं असं सुद्धा सांगितलेलं असतं. इतकंच नव्हे तर अहिल्यादेवींनी अनुष्कासाठी फुलांच्या पायघड्यांचा घाट घातलेला असतो आणि दामिनीला तो बिघडवायचा असतो म्हणून ती पारूला पुढच्या दरवाजाने आत यायला सांगते.
आणखी वाचा – अनुराग कश्यपबरोबरच्या घटस्फोटनंतर कल्की कोचलिनची होती वाईट अवस्था, भाड्यावरही घर मिळालं नाही तेव्हा…
पारू पुढच्या दरवाजाने आत येणार इतक्यातच प्रिया पारूला थांबवत सांगते की, अगं तुला माहिती नाहीये का इथून फक्त किलोस्करांची मोठी सून आत येणार. नशीब तू आत गेली नाहीस. नाहीतर काहीतरी चुकीचं घडलं असतं’ तितक्यात अनुष्का गाडीतून खाली उतरते आणि प्रिया अनुष्काचं कौतुक करते. त्यानंतर अनुष्काच्या अंगावर पारू फुलं उधळते आणि तिला आत घेऊन येते. प्रिया अनुष्का आणि पार्वती या तिघीही फुलांच्या पायघड्यांवरून घरामध्ये येतात. अनुष्का आदित्यला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. त्यानंतर अनुष्का सांगते की, मला आदित्यशी एकांतात बोलायचं आहे असं म्हणून आदित्य व अनुष्का बाहेर बोलायला जातात. आता अनुष्का किर्लोस्कर कुटुंबाची सून होण्यास होकार देणार का हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.