Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, प्रीतम व प्रिया यांच्या लग्नानंतरचा गोंधळ घातल्यानंतर सगळेजण देवदर्शनाला जायला निघालेले असतात. प्रिया व प्रीतम यांच्याबरोबर अहिल्यादेवी पारू व आदित्य यांना सुद्धा देवदर्शनाला जायला सांगतात. पारू अहिल्यादेवींचे आशीर्वाद घ्यायला येते तेव्हा अहिल्यादेवी विचारतात, ‘तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का?’. यावर पारू सांगते की, ‘नाही देव दर्शनाला जात आहे म्हणून तुमचे आशीर्वाद घ्यायचे होते’, असं म्हणत ती त्यांचा आशीर्वाद घेते. यावर अहिल्यादेवी म्हणतात, ‘तू सर्वांची काळजी घेतेस, कालच्या शिराप्रमाणे तू खरंच गोड आहेस पण कालचा शिरा तू बनवायला नको होतास’, हे ऐकताच पारू स्तब्ध होते.
यावर अहिल्यादेवींची माफी मागत पारू म्हणते, ‘पण हे मी मुद्दाम केलं नाहीये. प्रिया मॅडमकडून रवा करपला त्यामुळे मला जे सुचलं ते मी केलं’. यावर अहिल्यादेवी सांगतात, ‘हो प्रियाची बाजू सांभाळून घ्यायला तू त्या क्षणाला जे केलंस ते योग्यच केलंस पण किर्लोस्करांच्या सूनेच्या हातानेच हा प्रसाद जायला हवा होता हे मात्र चुकलं’. हे ऐकल्यावर पारू घाबरते मात्र अहिल्यादेवी तिची समजूत काढतात आणि दोघीही खाली येतात. देव दर्शनाला जायला सगळेजण निघतात तेव्हा अहिल्यादेवी पारूवर सगळी जबाबदारी सोपवतात. रस्त्यात जात असतानाच आदित्यची गाडी बंद पडते. त्यावेळेला सगळेजण गाडी बाहेर उतरतात. गाडी बाहेर उतरल्यानंतर आदित्य गाडी रिपेअर करत असतो तेव्हा पारू त्याला विचारते, ‘मी तुम्हाला काही मदत करु का?’.
तर इकडे प्रिया व प्रीतम एकांतात वेळ घालवत असतात. त्याच वेळेला पारू व आदित्य यांच्याही एकमेकांबद्दलच्या भावना सुंदर अशा रोमँटिक गाण्यातून रेखाटण्यात आल्याचे पाहायला मिळतेय. सुंदर अशा गाण्यातून प्रिया-प्रितम व पारू-आदित्य यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळतोय. तर इकडे अहिल्यादेवी आदित्यच्या लग्नाची काळजी श्रीकांत जवळ व्यक्त करतात. इतक्यातच गुरुजींचा त्यांना फोन येतो आणि गुरुजींकडून आदित्यसाठी एक स्थळ सुचवलं जातं. ते लोक उद्याच भेटायला येणार आहेत असंही यावेळी सांगितलं जातं. त्यावर आदित्यला अहिल्यादेवी फोन करुन सांगतात की, ‘देवदर्शन झालं की तुम्ही ताबडतोब घरी या उद्या आपल्याकडे महत्त्वाचे पाहुणे येणार आहेत’.
तर इकडे दामिनी घरी बसून काय करायचा म्हणून ती पारू व आदित्य यांच्या नात्याचा खुलासा कसा होईल यासाठी ती पारूच्या घरी जाते. गणीला घराबाहेर काढून ती पारूच्या बॅगची छाननी करताना दिसते. त्यावेळी दामिनीला आदित्यने दिलेली चिट्ठी सापडते. आता ही चिठ्ठी घेऊन दामिनी अहिल्यादेवींकडे येते आणि सांगते की, ‘तुमचा मुलगा हा काय करतोय हे तुम्हाला समजायला हवे त्यामुळे तुम्ही ही चिठ्ठी वाचा’. आता अहिल्यादेवी यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.