‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेत एक मोठं रंजक वळण आलेलं पाहायला मिळत आहे. मालिकेत अहिल्यादेवींचा जीव वाचवून पारुने स्वतःचा जीव धोक्यात घातलेला असतो. दरम्यान पारूची प्रकृती ही गंभीर असल्याचे डॉक्टर सांगतात. पारूला रक्ताची सक्त गरज असते मात्र तिचा जो रक्तगट असतो तो कुठेच उपलब्ध नसतो. आणि पारूचा रक्तगट आणि अहिल्यादेवी यांचा रक्तगट सारखाच असतो. अहिल्यादेवी पारुला रक्त देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचतात हा एक चमत्कारच असतो. त्यानंतर पारूला बरं वाटावं, लवकर शुद्ध यावी यासाठी अहिल्यादेवी देवाकडे अभिषेक करायचं ठरवतात आणि गरजूंना मदतही करतात. (Paaru Marathi Serial)
अहिल्यादेवी अभिषेक करायला बसतात त्यावेळेला इकडे दिशा पारुला भेटायला आलेली असते. पारुला काही करूनच संपवायचं हा निर्णय दिशाने घेतलेला असतो. त्यामुळे दिशा कारण काढून मारुती व गणीला घरी पाठवते. त्यांच्यासोबत प्रीतमही जातो, तर आदित्य व दिशा पारुजवळ थांबतात. तितक्यात आदित्यला कोणाचातरी फोन येतो म्हणून तो फोनवर बोलायला बाहेर निघून जातो. तेव्हा दिशा पारूचा बदला घ्यायचा ठरवते. दिशा पारुला भरपूर काही बोलते आणि म्हणते की, तुला यापुढची अहिल्यादेवी किर्लोस्कर व्हायचंय का?, म्हणून तू इतकी चांगलं वागण्याचा नाटक करत आहेस. इतकं पण चांगलं कोण कसं वागू शकतं?, हेच मला कळत नाही, असेही ती म्हणते.
पुढे ती म्हणते की, अहिल्यादेवींच्या मनात स्वतःची जागा बनवून तुला या किर्लोस्कर घरावर राज्य करायचे आहे हे मला कळतंय पण ही गोष्ट मी कधीच घडू देणार नाही, कारण या पुढे किर्लोस्कर साम्राज्य संपूर्ण माझ्याच हातात असणार आणि मी माझ्या बोटावर नाचवणार. त्यानंतर दिशा रागारागात पारुला लावलेला ऑक्सिजन मास्क काढते इतक्यात पारू जोरजोरात श्वास घेऊ लागते, आणि त्याच वेळेला अहिल्यादेवी अभिषेक करत असताना देवीचा आशीर्वाद म्हणून त्यांच्या अंगावर फुल पडतं. तर इकडे आदित्य फोन ठेवून पारूच्या आठवणीत रमलेला असतो. त्यानंतर आदित्यला पारूचा भास होतो आणि तो धावत धावत पारूजवळ येतो तितक्यात पारूला शुद्ध आलेली असते हे पाहून दिशा खूपच घाबरते आणि त्याच वेळेला मारुती व गणी देखील तिथे आलेले असतात.
पारूला शुद्ध आल्यानंतर डॉक्टर येऊन चेक करून पारूची प्रकृती उत्तम असल्याचे सांगतात. हे पाहून सगळेजण आनंदी होतात. तर इकडे दिशाचा डाव तिच्यावरच पलटलेला असतो. आता दिशा पारुला काही त्रास देणार का?, दिशा पारूचा काटा काढणार का?, हे पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.