Sharayu Sonavane : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेत नवनवीन अपडेट येत आहेत. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. मालिकेचं कथानक हे निरागस गावाकडून आलेल्या एका मुलीभोवती फिरणार आहे, त्यामुळे शहरांत आल्यावर या निरागसतेला जागा नसलेली पाहून त्या मुलीचा उडालेला गोंधळ मालिकेत पारू मार्फत दाखवण्यात येत आहे. पारू ही भूमिका मालिकेत शरयू सोनावणे साकारत आहे. शरयूच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. मालिकेला प्रेक्षक वर्ग भरभरुन प्रतिसाद देत असून शरयूवर प्रचंड प्रेम करत आहेत. शरयूने आजवर अनेक भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. तसेच अभिनयाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही बरीच चर्चेत राहिली आहे.
अभिनेत्री तिच्या खऱ्या आयुष्यातील लग्नामुळे खूप चर्चेत राहिली आहे. शरयूने तिच्या लग्नाच्या थेट वर्षभराने लग्न केलं असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. अभिनेत्रीच्या या आनंदाच्या बातमीने अनेकांना धक्का बसला. थेट लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच शरयूने लग्नसोहळ्यात खास फोटो शेअर करत आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. पारूने निर्माता जयंत लादेसह साखरपुडा समारंभ उरकत त्याचे काही फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले होते. मात्र त्यानंतर त्यांनी केव्हा लग्न केलं हे कळलच नाही.
सध्या शरयू ‘पारू’ या मालिकेत असून नुकत्याच इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या सासूबाईंबरोबरच्या बॉण्डबद्दल भाष्य केलं. शरयूच सासर हे पुण्यातील आहे. आणि सध्या पारू व लक्ष्मी निवास या मालिकांचे महासंगम असून याचे चित्रीकरण पुण्यात सुरु आहे. त्यामुळे शरयू सध्या पुण्यात तिच्या सासरी आहे. सासरहून ती चित्रीकरणाला ये-जा करत आहे. अशातच मुलाखतीदरम्यान शरयूने तिच्या सासूबरोबरचा बॉण्ड शेअर केला.
शरयूने ‘इट्स मज्जा’ वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी शरयूने तिच्या सासूबाई तिच्या आवडीचं जेवण बनवून तिला डब्यात देतात याबाबत सांगितलं. शरयू म्हणाली, “माझ्या आईने म्हणजेच माझ्या सासूबाईंनी त्यांच्या हाताने बनवलेला डबा मला दिला होता. पुण्यात असल्याने मी चित्रीकरणासाठी ये-जा करतेय. तर रोज माझ्या सासूबाई माझ्यासाठी छान छान जेवण बनवतात, शिवाय मला काय हवं नको तेही त्या बघतात. आजही त्यांनी माझ्यासाठी छान टिफिन दिला होता त्यामुळे सेटवर साग्रसंगीत जेवण असलं तरी मला त्यांनी दिलेला टिफिन खाणं महत्त्वाचं वाटलं”. यावरुन शरयू आणि तिच्या सासूबाईंमधील खास बॉण्ड दिसून येतो.