‘बिग बॉस १७’च्या पर्वात सुरुवातीपासूनच चांगलीच रंजक वळणं पाहायला मिळत आहेत. या कार्यक्रमात सुरुवातीपासूनच बरीच भांडणं, वादविवाद, मारामारी होत असल्यामुळे कार्यक्रम चांगलाच गाजत आहे. अशातच मागच्या आठवड्यात ओरी उर्फ ओराहन अवत्रामणीचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवेश चांगलाच चर्चेचा विषय ठरला. पण त्याने एका दिवसातच घरातून काढता पाय घेतला. त्याच्या अचानक येण्याने तो घरात वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आला असल्याचं सुरुवातीला सगळ्यांना वाटलं होतं. मात्र तो घरातील सदस्यांच्या मनोरंजनासाठी खास पाहुणा म्हणून आला होता. ओरी ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर त्याला ‘बिग बॉस १७’ कोण जिंकणार? असं विचारण्यात आलं. तेव्हा त्याने चिंटू हे नाव घेतलं. (Orry said the winner name of bigg boss 17)
शोमधून बाहेर आल्यानंतर ओरीने पिंकविलाला एक मुलाखत दिली. तेव्हा त्याने ‘बिग बॉस’च्या घरातील हालहवाल सांगितला त्याचबरोबर त्याने हा शो कोण जिंकणार याबद्दलही वक्तव्य केलं. ओरी म्हणाला, “जेव्हा ईशाने अभिषेकला सोडून चिंटूला म्हणजेच समर्थ जरेलला निवडलं तर नक्कीच त्याच्यात काहीतरी खास आहे. ज्याप्रकारे समर्थ चालतो, वागतो त्याला पाहून मला खूप छान वाटतं. मला असं वाटतं की प्रेक्षकांनाही हे सगळं नक्कीच आवडत असेल”.
ओरी पुढे सांगतो, “मी स्वतः जर प्रेक्षक असतो तर चिंटूला बघायला मला आवडलं असतं. त्याचे डिंपल्स, त्याचे डोळे, त्याचा मजेशीर अंदाजात यासगळ्या गोष्टी मला बघायला नक्कीच आवडल्या असत्या. माझ्या माहितीनुसार, चित्रपट, टीव्ही शोचे केवळ तीन उद्दिष्ट असतात. मनोरंजन, मनोरंजन, मनोरंजन. या तिन्हीही गोष्टी चिंटूकडे आहेत”.

‘विकेंड वार’च्या आठवड्यात ओरीने सलमान खानबरोबर बऱ्याच मजेशीर गप्पा मारल्या. ओरीने हे ही सांगितलं की त्याला पहिल्यांदा असं वाटलं होतं की सलमान खान बिग बॉस आहे म्हणजे जेव्हा त्याला बिग बॉसच्या घरी यायचा कॉल आला तेव्हा त्याला वाटलं की सलमान खानच्या घरी बोलवण्यात आलं. पण त्याला या शोमध्ये बोलावलं गेलं आहे हे नंतर कळलं.