विनोदाचं अचूक टायमिंग जुळवत ओंकार भोजनेने कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, या रिऍलिटी शो मधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला विनोदवीर म्हणजे अभिनेता ओंकार भोजने.(onkar bhojane new film)
परफेक्ट,अफलातून अभिनयाने ओंकारने समस्त प्रेक्षक वर्गाला वेड लावले. सर्वांना हसविण्यात तरबेज असलेला आणि ‘कोकण कोहिनूर’ म्हणून साऱ्या रसिक प्रेक्षक वर्गाचा लाडका अभिनेता ओंकार आता मालिकाविश्वातून बाहेर येत पुन्हा सिनेविश्व आणि नाटकविश्वाकडे वळला आहे. एकांकिका क्षेत्रापासून ओंकारने अभिनयाची सुरुवात केली. मध्यंतरी त्याने छोट्या पडद्यावर आपला वावर वाढवला होता. याशिवाय ओंकारने नाटकविश्वातही चांगला ठसा उमटविला. सिनेसृष्टीत पाऊल टाकत ओंकार एकामागोमाग एक चित्रपट करण्यात व्यस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे.
ओंकारच्या मुख्य भूमिकेत असलेल्या आगामी ‘मुंबई १६’ या शॉर्टफिल्म मधील गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतंय.छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचेच प्रेरणास्रोत महाराजांच्या आशीर्वादाने प्रेरित होऊन सामान्य माणसाच्या जगण्याला सक्षम बनववणारा ‘मावळा’ हा ‘पोवाडा’ तुफान गाजतोय. सामान्य मुंबईकर हा त्याच्या जन्मभूमीसाठी कसा लढा देतो अशी काहीशी कहाणी या शॉर्टफिल्मची आहे. ओंकारचा या गाण्यात एक वेगळाच लूक पाहायला मिळतोय. एका सामान्य मुंबईकराच्या भूमिकेत ओंकारला पाहणं रंजक ठरतंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याची ही गाथा पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

ओंकार भोजनेचा प्रवास(onkar bhojane new film)
कॉमेडीचं परफेक्ट टायमिंग आणि ‘अगं अगं आई, बाबा ओरडू ओरडू, मला घाबरू घाबरू..’ या ओंकारच्या संवादाने समस्त प्रेक्षकांना वेड लावले. आता मात्र ओंकार विनोदी भूमिकेतून बाहेर येत एक आशयघन विषय हाताळताना दिसणार आहे. एका वेगळ्या अंदाजात ओंकार ‘मुंबई १६’ या शॉर्टफिल्म मधील ‘मावळा’ या पोवाड्यात पाहायला मिळतोय, त्याचे चाहते ही नक्कीच त्याच्या या वेगळ्या भूमिकेवर प्रेम करतील यांत शंका नाही. ओंकारच्या कामाबद्दल सांगायचे तर तो ‘बॉईज २’, ‘बॉईज ३’, ‘घे डबल’ आणि ‘सरला एक कोटी’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसला आहे. तर लवकरच भाऊ कदम आणि ओंकारची मुख्य भूमिका असलेलं ‘करून गेलो गाव’ हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
====
हे देखील वाचा – ‘मी आणि निखिल खूप….’निखिल आणि स्नेहलच्या अफेरच्या चर्चांवर अखेर स्नेहल शिदमचं स्पष्टीकरण
====
अभिनयाच्या विविध प्रकारातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास ओंकार सज्ज असला तरीही प्रेक्षक मात्र त्याला हास्यजत्रेत पुन्हा पाहण्यात आतुर आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये ओंकारला प्रेक्षकवर्ग खूप मिस करतोय, त्याने परत यावे यासाठी बऱ्याच कमेंटही सोशल मीडियावरून प्रेक्षक करत आहेत.(onkar bhojane new film)