Nivedita Saraf : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 139 जणांना पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यादरम्यान मराठी चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय कामगिरी करणारे अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ही आनंदाची बाब ऐकून कलाविश्वात सर्वत्र आनंद पसरला आहे. इतकंच नाही तर अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे. अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं तेव्हा व्यक्त होताना निवेदिता यांनी पद्मश्री पुरस्कार मिळण्याची इच्छा व्यक्त केली होती. अखेर त्यांची ही इच्छाही पूर्ण झाली आहे.
पद्मश्री जाहीर झाल्यावर अशोक सराफ यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना असं म्हटलं की, “मला खरंच खूप आनंद झाला आहे. मी खूप आभारी आहे. हा एकट्या अशोकचा सन्मान नाही आहे, हा महाराष्ट्रातील प्रत्येक प्रेक्षकाचा सन्मान आहे. कारण, त्यांनी नेहमी अशोकवर प्रेम केलं. त्यांच्या अभिनयावर प्रेम केलं. त्यांची जी अविरत मेहनत आहे. इतक्या वर्षांनी त्याचं सार्थक झालं. अशोकने केवळ एकाग्रतेने अभिनय एके अभिनयच केला. त्या सगळ्याची ही पोचपावती आहे. मी प्रेक्षकांची खूप ऋणी आहे, महाराष्ट्राच्या जनतेची आणि केंद्र सरकारची कारण ही आम्हा कुटुंबीयांसाठी खूपच आनंदाची बाब आहे”.
आणखी वाचा – साधी भोळी माझी आई! आईच्या वाढदिवसानिमित्त रुपाली भोसलेची भावुक पोस्ट, म्हणाली, “खूप कष्ट सोसले पण…”
पुढे त्या म्हणाल्या की, “अशोकने त्यांच्या सगळ्या प्रेक्षकांना नेहमी देवासमान मानलंय. त्यांना कामापुढे कधीच काही दिसलं नाही, कधी पैसे कमावणं हे देखील उद्दिष्ट नव्हतं. मी जगात काहीही करु शकतो पण, माझ्या प्रेक्षकांना मी कधीच फसवू शकत नाही, असं ते नेहमी म्हणायचे. त्यामुळे एवढी वर्षे त्यांनी केवळ प्रामाणिकपणे आपलं काम केलं. भूमिका छोटी असो, मोठी असो त्यांनी नेहमी प्रामाणिकपणाने सर्व केलं. महाराष्ट्र भूषण आमच्यासाठी विशेष आहेच आणि आता त्यांना पद्मश्री मिळाला आहे, म्हणून मी खरंच खूप आनंदी आहे”.
आणखी वाचा – मध्या, आभ्या, विक्या, किरण्या शाळेत पुन्हा परतले, पण रेश्मा व केवडामध्ये गैरसमज, काय असेल नेमकं कारण?
निवेदिता सराफ पुढे म्हणाल्या, “आम्हाला हा सन्मान महाराष्ट्रातील लोकांना समर्पित करायचा आहे आणि अर्थातच त्यांच्या कारकिर्दीला आकार देण्यात भूमिका बजावणाऱ्या सर्व दिग्दर्शक, लेखक आणि सह-कलाकारांना हा पुरस्कार आम्ही समर्पित करतो”.