Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’ सुरु झालं तेव्हापासून अनेक कलाकार मंडळी आपलं मत सोशल मीडियाद्वारे व्यक्त करताना दिसतात. ‘बिग बॉस’च्या पर्वात स्पर्धकांकडून होणाऱ्या सततच्या चुका या प्रेक्षकांना, कलाकार मंडळींनाही पटत नाही आहेत या चुका दुरुस्त करायच्या सोडून ही स्पर्धक मंडळी पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका करताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वातील टीम ए मधील निक्की, जान्हवी, अरबाज, वैभव या साऱ्या स्पर्धकांवर प्रेक्षकांचा, कलाकार मंडळींचा रोष असलेला पाहायला मिळतोय. ‘बिग बॉस’च्या घरात वावरत असताना कोणतंच तारतम्य न बाळगता ही स्पर्धक मंडळी अरेरावी करत इतर स्पर्धकांवर वर्चस्व गाजवताना दिसतात आणि हे वर्चस्व साऱ्यांना खटकू लागल्याचे पाहायला मिळत आहे.
टीम बी मधील धनंजय पोवार, आर्या जाधव, अंकिता वालावलकर, पॅडी कांबळे, सूरज चव्हाण या स्पर्धकांना संपूर्ण महाराष्ट्र पाठिंबा देताना दिसतोय. टीम बीच्या स्पर्धकांचा खेळ उत्तम आहे. तरीसुद्धा टीम ए मधील स्पर्धकांना हवा तितका ओरडा दिला जात नाही यामुळे प्रेक्षक मंडळी रितेशवरही नाराज असल्याचे पाहायला मिळाले. अनेक कलाकार मंडळी या स्पर्धकांवर भाष्य करत आपलं मत स्पष्टपणे मांडताना दिसतात. यापैकी एक अभिनेत्री म्हणजेच सुरेखा कुडची. लावणीक्वीन सुरेखा कुडची यांनी ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभाग घेतला होता. ‘बिग बॉस मराठी’ फेम या अभिनेत्रीने आता ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वातील स्पर्धकांंबाबत केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे.
याआधीही सुरेखा अनेकदा निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल या स्पर्धकांबद्दल व्यक्त होताना दिसल्या. आता यानंतर नुकत्याच झालेल्या भागात कॅप्टन पदाचा मानकरी निक्की झाल्यानंतर निक्कीचं वागणं बदललं असल्याचं म्हणत सुरेखा या पुन्हा एकदा निक्कीवर भडकल्या आहेत. सुरेखा यांनी पोस्ट शेअर करत, “निक्की अगं ते घर सर्वांच आहे. तू मालकीण नाही आहेस. आणि काय ग तू म्हणशील ती पूर्व दिशा का ?, तुझ्या कॅप्टन्सीच्या वेळेस सगळ्यांनी तुझ ऐकायचं का तर तू सगळ्यांशी नीट वागते म्हणून आणि अंकिता कॅप्टन असताना तू किती छळलंस गं सगळ्यांना. आठवतं नाही का बाईई”.
पुढे त्यांनी, “नुसता तोंडाचा पट्टा चालू असतो. दुसऱ्या मॅडम काय शांत झाल्या वाटतं. कल्पना दिली असावी प्रकरण तापलंय शांततेत घे म्हणून. उद्याची वाट अख्खा महाराष्ट्र पाहतोय. भाऊचा धक्का. या घरात ज्याला बोलायचं भान नाही त्याला या घरात स्थान नाही”, असं म्हटलं आहे.