बॉलिवूडमध्ये बऱ्याच चित्रपटांनी यावर्षी बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला होता. त्यापैकी एक चित्रपट ज्याने बरेच रेकॉर्ड मोडले आहेत तो म्हणजे ‘जवान’. अभिनेता शाहरुख खान मुख्य भूमिकेत असणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा हिनेदेखील या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला असला तरीही ती तिच्या या पदार्पणावर समाधानी नसल्याचं दिसून येत आहे. हा चित्रपट नयनतारासाठी एक मोठा चित्रपट होता. पण हा चित्रपट हीट होण्यामागचं श्रेय एकट्या शाहरुखला दिलं जात असल्याचं म्हटलं जात आहे. काहीजण तर हे देखील म्हणत आहेत की हा चित्रपट नयनतारा-शाहरुखचा नसून शाहरुख-दीपिकाचा आहे. या गोष्टीवर नयनतारादेखील नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. (Nayanthara angry at not getting credit for jawans success)
‘टाइम्स नाउ’च्या वृत्ताने नाव न घेता एक मोठ्या साऊथ चित्रपट निर्मात्याने दिलेल्या माहितीनूसार लिहिलं आहे की, तामिळ चित्रपटसृष्टीत नायक व चाहते तर नयनताराची पूजा करतात. तामिळनाडूमध्ये तिला लेडी सूपरस्टार म्हणून संबोधलं जातं. ‘जवान’ चित्रपटात असलेला छोटासा रोल पाहता तिचे चाहते उदास आहेत. नयनतारा देखील यामुळे बरीच नाराज झालेली पाहायला मिळणार आहे. ‘जवान’ हा चित्रपट शाहरुख-नयनताराच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. पण सगळीकडे हा चित्रपट शाहरुख व दीपिकाचा असल्याचं बोललं जात आहे.
चित्रपट निर्माता पुढे सांगतो की, नयनताराला आता फक्त तामिळ चित्रपटात काम करायचं आहे. नयनताराबरोबर असा व्यवहार करण्याचं धाडस साऊथच्या चित्रपटसृष्टीत कोणत्याच चित्रपट निर्मात्याकडे नाही. अगदी ॲटली जो ‘जवान’ चित्रपटाचा दिग्दर्शक आहे त्याच्याकडेही नाही.
काही काळापूर्वी नयनतारा एका चित्रपटासंदर्भात प्रसिद्ध चित्रपट निर्माते संजय भंसाळी यांच्याशी चर्चा करत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र चित्रपट निर्मात्याच्या वक्तव्यानंतर नयनताराला हिंदी चित्रपटांमध्ये काम करणं कठीण असल्याचं दिसत आहे. जवान चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यात तिने ऑफिसर नर्मदा राय यांची दमदार भूमिका केली होती. चित्रपटातील तिच्या अभिनयाचं बरंच कौतुक होत आहे. पण शाहरुखबरोबरची तिची केमेस्ट्री प्रेक्षकांना आवडली नसल्याचंही दिसून येत आहेत.