सोशल मीडिया हे कलाकारांसाठी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियाद्वारे आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अशीच सोशल मीडियावर कायम सक्रीय असणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शर्मिला शिंदे. शर्मिला शिंदे ही सध्या झी मराठीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती दुर्गा जहागीरदार हे पात्र साकारत असून तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. शर्मिला शिंदे ही सोशल मीडियावबर अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
अशातच अभिनेत्रीने नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शर्मिलाने तिचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. यात अभिनेत्रीने निळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला असून या फोटोंत ती खूपच सुंदर दिसत आहे. मात्र या फोटोखाली तिने लिहिलेल्या कॅप्शनमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. तिने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये तिने तंबाखू मळत असल्याचे भासत आहे. यामुळे तिने या फोटोला साजेसं असं “नाही मी तंबाकू मळत नाहीये. त्यामुळे यावर तशी कमेंट करु नका” असं म्हटलं आहे.
तिच्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी या फोटोखाली अनेक मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. या पोस्टखाली सहअभिनेत्री सानिका काशीकरने “पहिला फोटो मशेरी लावायच्या आधीचा आणि दूसरा फोटो मशेरी लावल्यानंतरचा आहे” असं म्हटलं आहे. तर एकाने “तंबाखू आधीच मळून झाला आहे, फोटो नंतर काढला आहे” अशी कमेंट केली आहे. तर अनेकांनी शर्मिलाचा हा फोटो आवडल्याच्या अनेक कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान, शर्मिलाने याआधीही अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. ‘पुढचं पाऊल’ मालिकेतील तिची रुपाली ही भूमिका चांगलीच गाजली. यानंतर तिने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. मराठीसह तिने हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे.