Navri Mile Hitlerla Marathi Serial : नुकतीच दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा झाला असला तरी मराठी मालिकांमध्ये अजूनही दिवाळी साजरी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतही सध्या दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतील लीला आणि एजेची कथा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. मालिकेत येणाऱ्या नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. त्यामुळे ही मालिका बघण्यात प्रेक्षकांना आणखी रस निर्माण होऊ लागला आहे. मालिकेत नुकतंच लीला व एजे यांची दिवाळी साजरी होतानाचे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. (Navri Mile Hitlerla Serial Updates)
मालिकेच्या शुक्रवारच्या भागात लीला एजेंना उटणं लावण्यासाठी बोलवायला जाते. मात्र, एजे तिला नाही म्हणत असतो. तरीही लीला हट्ट धरते. एजे तिला म्हणतो, “तुला सांगितलं ना, मी असलं काही करणार नाही”, त्यावर लीला म्हणते, “चूपचाप पाटावर बसा, नाहीतर जो माझं ऐकतो, त्याला मी बोलवेन.” तेवढ्यात त्यांचा टायगर नावाचा कुत्रा पळत येतो आणि एजेच्या कपड्यांना धरून त्याला ओढत पाटावर घेऊन जातो. त्यानंतर लीला एजेला उटणे लावते. दिवाळीला नवऱ्याने बायकोला गिफ्ट देण्याची पद्धत आहे. मात्र एजे व लीला यांच्या दिवाळी पाडव्याला एजेंऐवजी लीलाच त्याला गिफ्ट देणार आहे.
झी मराठीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात एजे व लीला यांच्या दिवाळी पाडव्याचे क्षण दाखवण्यात आले आहेत. यावेळी लीला एजेंना पहिल्या पाडव्यानिमित्त ओवाळते. मग आजी एजेला “पहिल्या पाडव्यानिमित्त लीला छानशी ओवाळणी दे” असं म्हणतात. यावर एजे “सॉरी मी काही गिफ्ट आणलं नाही” असं म्हणतो. यावर लीला असं म्हणते की, “यावेळी मीच एजेंना एक गिफ्ट देणार आहे” असं म्हणते. लीलाने दिलेलं गिफ्ट बघून खरंतर एजेंना राग येतो.
पण लीला त्यांना त्या गिफ्टचा अर्थ समजावून सांगत असं म्हणते की, “तुम्ही याकडे बघितलं तर तुम्हाला कायम याची जाणीव होईल की माणसाने कायम हसलं पाहिजे आणि एजे तुम्हाला राग आला की तुम्ही बझर दाबता. मग त्यापेक्षा आता तुम्हाला राग आला तर की हा स्माईली बॉल हातात धरा आणि दाबा”. मालिकेचा हा नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.