Navri Mile Hitlarla :’झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेतून एजे व लीला यांचा एक वेगळाच प्रवास पाहायला मिळतोय. मालिकेत कमी वयाच्या सासूवर तिच्या तिन्ही सूना वर्चस्व करताना पाहायला मिळत आहेत. थोडीशी वेंधळट, गोंधळ घालणारी लीला आणि कडक शिस्तीचा आणि परफेक्ट असा एजे या दोन पात्रांमुळे मालिकेचं वेगळं असं कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस पडतंय. आतापर्यंत मालिकेत लीला तिच्या सूनांना घाबरायची आणि त्यांचे सर्व काही ऐकायची. सूनांनी लीलाविरुद्ध केलेली कटकारस्थानही तिला कळायची नाहीत, अशा अनेक गोष्टी घडताना दिसल्या आणि हे सगळं काही लीलाने गपगुमान सहन केलेले दिसलं. मात्र आता तिचं बदललेलं रुप पाहायला मिळणार असल्याच समोर आलंय.
मालिकेच्या नव्या प्रोमोने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतले आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये लीलाचं बदलतं रुप पाहून अनेकांनी या प्रोमोवर कमेंट करत पसंती दर्शवलेली पाहायला मिळतेय. प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, दुर्गा, सरस्वती व लक्ष्मी तिघी घरात गप्पा मारत पत्ते खेळत असतात. तितक्यात घराचा दरवाजा उघडतो आणि दारात लीला उभी असते. ‘लीला तू इथे?’, असं त्या विचारताच लीला म्हणते, “आता लीला नाही आता सासूबाई म्हणायचं, चला कामाला लागा”, असं ती म्हणते. आणि तिघींना चांगलंच कामाला लावते.
भांडी घासताना, फरशी पुसताना, झाडू मारताना त्यांची होणारी तारांबळ पाहणं रंजक ठरतंय. शिवाय दिवाळीचा फराळ करतानाही त्यांचे पडलेले चेहरे पाहणं रंजक ठरणार आहे. लीला त्यानंतर एक डायलॉग म्हणते, “आता खोचायचा पदर आणि विसरायचं हसू तुम्हाला सरळ करायला येतेय लीला द सासू”. आता लीला या तीन सूनांची कशी शाळा घेणार हे पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.
‘नवरी मिळे हिटलर’चा हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर कमेंट्स करत मालिकेला पसंती दर्शविली आहे. “नशीब लीला घरी आली आणि तिची सासूगिरी एकदाची सुरु झाली”, “लीला आणि एजेचं लग्न झाल्यापासून ज्या गोष्टीची वाट बघत होते, ती गोष्ट एकदाची घडणार”, अशा अनेक कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.