Akshaya Deodhar New Serial : ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच सर्वांची लाडकी पाठकबाई अक्षया देवधर. अक्षयाने या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेमुळेच अक्षयाला खऱ्या अर्थानं लोकप्रियता मिळाली. इतकंच नव्हे तर अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातही मालिकेतील तिचा सहकलाकार आला आणि त्यांनी लग्नगाठ बांधली. पाठक बाई व राणादा ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र आली आणि एकत्र येत त्यांनी साऱ्यांना आनंदाचा धक्का दिला. आता पुन्हा एकदा पाठक बाई ‘झी मराठी’वर कमबॅक करताना दिसणार असल्याचे समोर आले आहे.
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेनंतर आता पाठकबाई या ‘लक्ष्मी निवास’ या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं समोर आलं. नुकताच ‘झी मराठी पुरस्कार सोहळा २०२४’ चा पहिला भाग प्रसारित करण्यात आला. यावेळी ‘झी मराठी’ वाहिनी कडून ‘लक्ष्मी निवास’ या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. इतकंच नव्हे तर या पुरस्कार सोहळा दरम्यान ‘झी मराठी’ वाहिनीने ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेचा पहिला प्रोमोदेखील प्रेक्षकांच्या भेटीस आणला. या मालिकेत अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि अभिनेते तुषार दळवी हे मुख्य भूमिकेत असल्याचे पाहायला मिळतेय.
आणखी वाचा – बिश्नोई समाजाने सलीम खान व सलमान खान यांचा पुतळा जाळला, ‘या’ वक्तव्याने उडाला भडका, प्रकरण निवळलं नाही तर…
मालिकेच्या प्रोमो मध्ये त्यांचा फॅमिली फोटो पाहायला मिळत असून यात अक्षया देवधर महत्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचा समोर आलंय. पुन्हा एकदा ‘झी मराठी’ वाहिनीवर अक्षया देवधरला पाहणं प्रेक्षकांना रंजक ठरणार असल्याचे दिसतेय. खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा ‘झी मराठी’ वाहिनीवर पुनरागमन करण्यासाठी अक्षया सज्ज झाली आहे. तिच्या जोडीला यामध्ये अभिनेता कुणाल शुक्ला महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

अक्षया नव्या मालिकेत झळकणार हे समजताच नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. या मालिकेत अक्षयाला पाहायला चाहतावर्ग उत्सुक आहे. या कौटुंबिक मालिकेत प्रेक्षकांना दमदार कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका नेमकी कधीपासून सुरु होणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.