मराठी चित्रपटसृष्टीमधील गाजलेल्या चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘नवरा माझा नवसाचा.’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. चित्रपटातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. तब्बल २० वर्षांनंतर या चित्रपटाचा पुढचा भाग म्हणजेच ‘नवरा माझा नवसाचा २’ २० सप्टेंबरला प्रदर्शित झाला. दमदार स्टारकास्ट, पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटालाही प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाला पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद हा मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या ओपनिंग्जपैकी होता १००० पेक्षा अधिक शोजने सुरुवात केलेल्या या चित्रपटाला ६०० पेक्षाही अधिक शोज हाऊसफुल्ल होते. (Navra Maaza Navsacha 2 on OTT)
या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १.८६ कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २.४३ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ३.५५ कोटींचा गल्ला जमवला. त्यामुळे या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त घौडदोड पाहायला मिळाली. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ५० दिवस पूर्ण झाले आहेत. अजूनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे. काही दिवसांपूर्वी ब्लॉकबस्टर ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाची सक्सेस पार्टी पार पडली. या सक्सेस पार्टीमध्ये चित्रपटातील कलाकार मंडळींसह इतर कलाकारांनी खास उपस्थिती लावली होती. अशातच आता बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर येण्यास सज्ज झाला आहे.
यासंदर्भात सचिन पिळगांवकर यांनी नुकतीच पोस्ट केली आहे. “आता ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट ‘अमेझॉन प्राईम’वर प्रदर्शित झाला असून चित्रपटगृहातदेखील सुरू आहे”, असं सचिन पिळगांवकरांनी त्यांच्या या पोस्टमधून सांगितलं आहे. त्यामुळे आता ज्यांनी चित्रपटगृहांमध्ये जाऊन हा चित्रपट बघितला नसेल त्यांना हा घरबसल्याही हा चित्रपट पाहता येणार आहे. तसंच ज्यांना चित्रपटगृहात जाऊन बघायची इच्छा आहे ते अजूनही चित्रपटगृहांमध्ये जाऊन हा चित्रपट बघू शकतात.
आणखी वाचा – कंगणा रनौतच्या आजीचे निधन, १०० हून अधिक होतं वय, अभिनेत्रीने लिहिली भावुक पोस्ट, म्हणाली, “तिचे आरोग्य…”
दरम्यान, ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, विजय पाटकर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळाली. या चित्रपटाची नवसाची गोष्ट कोकण रेल्वे प्रवासात घडली आहे. एका वेगळ्या नवसाची गोष्ट प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली.