मुंबई ही मायानगरी म्हणून ओळखली जाते. अनेकजण या शहरात आपल्या स्वप्नपुर्तीसाठी येत असतात. जमेल ते काम आणि मेहनत करत या शहरात स्थायिक होण्याचा विचार करतात आणि हे शहरही येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला आपलंसं करतं. मुंबईत येणारा प्रत्येक संघर्षयोद्धा हा कधीच उपाशी राहू शकत नाही असं म्हटलं जातं. ते यासाठी कारण या शहरात राहणारे अनेक रहिवासी आजूबाजूच्या शहरांतून येणाऱ्या प्रत्येकाला आपलं मानतात. बसण्यासाठी पाट देतातच. पण जेवणाचा ताटही पुढे करतात. स्वत:च्या ताटातलं हक्काने खाऊ घालणारी, मग त्यालाच आपलं व्यवसाय बनवणारी अनेकजण मुंबईत आहेत. मुंबईतील दादर मधील दर्शना वेंगुर्लेकर या त्यापैकीच एक. (Darshana Vengurlekar Annapurna Khanaval)
दर्शना वेंगुर्लेकर यांनी काही वर्षांपूर्वी दादर या शहरात छोट्याश्या खानावळीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही आणि आज त्या एक यशस्वी अन्नपूर्णा आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. ‘मज्जा पिंक’ या युट्यूब वाहिनीद्वारे नुकताच त्यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर आला. यावेळी दर्शना यांनी त्यांच्या एकूण प्रवासाबद्दल सांगितलं. यावेळी त्यांनी असं सांगितलं की, “गेल्या २० वर्षांपासून मी या खानावळीला सुरुवात केली असून इथल्या नोकरदारांनी व माझ्या कुटुंबीयांनी मला यात साथ दिली”.
आणखी वाचा – अजय देवगणच्या हाती निराशाच, ‘सिंघम अगेन’कडून प्रेक्षकांचा अपेक्षा भंग, आठ दिवसांमध्ये कमावले फक्त…
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “मला जेवणाची आवड होती आणि तीच आवड जपत मी या खानावळीच्या व्यवसायात आली. यात मला माझ्या ग्राहकांनी नेहमीच उत्तम साथ दिली. २० वर्षांपासून ग्राहकांनी मला या माझ्या छोट्याश्या खानावळीसाठी चांगलीच मदत केली. १२० चपात्या घेऊन मी माझ्या या खानावळीची सुरुवात केली आणि आज त्या चपात्यांची संख्या जवळपास ६०० ते ७०० च्या घरात आहे”. दादरच्या दर्शना वेंगुर्लेकर यांच्या रस्त्यावर असलेला एका छोट्या खानावळीमध्ये त्यांच्याकडील जेवणासाठी भली मोठी रांग लागते.
अर्धा-पाऊण तास लोक उभे राहून इथे अन्न खातात. विशेष म्हणजे इथे येणारे गिऱ्हाईक हे नेहमीचे आणि वर्षानुवर्षांपासूनचे आहेत. या खानावळीमध्ये त्यांना त्यांची लेक व भाचीची आधीपासूनच साथ लाभली आहे. बाकी त्यांचे काही कामगारही आहेत. त्यांचेही यात मोलाचे योगदान आहे. तसंच त्यांच्या पतीचाही त्यांना पाठिंबा मिळाला. एकटीने सुरुवात केलेल्या दर्शना यांच्या खानावळीमध्ये आता २ हून अधिक कामगार आहेत. या खानावळ चालवणाऱ्या महिलेचे नाव दर्शना असलं तरी त्यांना ‘अन्नपूर्णा’ ही पदवी देण्यात आली आहे आणि ही पदवी त्यांना त्यांच्या ग्राहकांनीच दिली आहे.