Malaika Arora Father Died : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या वडीलांनी राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी आपल्या वांद्रे येथील घरातून सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आपलं जीवन संपवलं. वडिलांच्या मृत्यूनंतर मलायका व अमृता यांच्यावर खूप मोठं संकट कोसळलं आहे. अद्याप अनिल अरोरा यांच्या आत्महत्येचं कारण समोर आलेलं नाही. ही घटना घडली तेव्हा मलायका अरोरा मुंबईत नव्हती, ती पुण्याहून तात्काळ मुंबईकडे रवाना झाली.
मलायकाच्या वडिलांच्या निधनाच्या बातमीने सिनेविश्वातील मंडळी त्यांना धीर देण्यासाठी घरी पोहोचत आहेत. मालयकाचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान व अर्जुन कपूरही उपस्थित होते. अनिल अरोरा यांनी आज सकाळी ९ वाजता आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येबद्दल कळाल्यानंतर अरबाज खान सर्वप्रथम तिथे पोहोचला होता. अनिल अरोरा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. अशातच या प्रकरणावर मुंबई पोलिसांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना झोन ९ चे डीसीपी राज तिलक रोशन पोलीस अधिकारी म्हणाले, “अनिल अरोरा ६२ वर्षांचे होते. त्यांचा मृतदेह सापडला आहे. ते सहाव्या मजल्यावर राहायचे. आमची टीम इथे पोहोचली असून आम्ही पुढील तपास करत आहोत”. “सुसाईड नोट सापडली आहे का?”, असं विचारल्यावर “आम्ही आता सखोल तपास करत आहोत, सर्वच बाजूंनी तपास करत आहोत”, असं उत्तर पोलिसांकडून मिळालं.
पुढे माध्यमांनी पोलिसांना असं विचारलं की, “अनिल अरोरा यांच्या कुटुंबियाकडून काही वैद्यकीय अडचणी होत्या का, याबाबत काही माहिती कळाली का?”, असं विचारल्यावर ते म्हणाले, “फॉरेन्सिक टीम इथे पोहोचली आहे. फॉरेन्सिक तपास चालू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आम्ही या प्रकरणाचा सखोल तपास करत आहोत. प्रथमदर्शनी ही आत्महत्या वाटत आहे. बाकी माहिती तपासानंतरच कळेल”.